‘इंद्रधनुष्य’चे आयोजन लांबणीवर
By Admin | Updated: October 12, 2015 02:45 IST2015-10-12T02:45:10+5:302015-10-12T02:45:10+5:30
राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे तयारी सुरू होती.

‘इंद्रधनुष्य’चे आयोजन लांबणीवर
नागपूर : राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य’च्या आयोजनाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे तयारी सुरू होती. परंतु नेमक्या याच कालावधीमध्ये दिवाळी येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागावर परिणाम लक्षात घेता ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन समोर ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी नवीन तारखांना परवानगी दिली आहे. आता हे आयोजन २२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरवर्षी ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान ‘इंद्रधनुष्य’चे दरवर्षी विविध विद्यापीठांमध्ये आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना ‘प्लॅटफॉर्म’ मिळावा हा यामागचा उद्देश असतो.
यंदा ही जबाबदारी नागपूर विद्यापीठाला देण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाकडून तयारीदेखील सुरू करण्यात आली होती. नागपूर विद्यापीठाच्या संघाची निवड चाचणीही घेण्यात आली. परंतु नोव्हेंबरमध्ये महोत्सवाच्या कालावधीतच दिवाळी येत असल्यामुळे विद्यार्थी किती प्रमाणात येतील, असा मुद्दा अचानक समोर आला. शिवाय अनेक विद्यापीठांच्या हिवाळी परीक्षासुद्धा या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
यात नागपूर विद्यापीठाचाही समावेश आहे. परीक्षेमुळे अनेक विद्यार्थी महोत्सवामध्ये सहभागी होण्यास पुढाकार घेणार नाहीत व जर विद्यार्थीच राहणार नाहीत तर महोत्सवाची रंगत वाढणारच नाही ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने विचार सुरू केला. विद्यार्थ्यांच्या हातातील संधी जाऊ नये यासाठी ‘इंद्रधनुष्य’च्या तारखा पुढे ढकलण्याबाबत अधिकाऱ्यांचे एकमतदेखील झाले. परंतु या बदलासाठी राज्यपाल कार्यालयाची परवानगी आवश्यक होती. नागपूर विद्यापीठातर्फे याबाबतीत राज्यपाल कार्यालयाला पत्रदेखील पाठविण्यात आले. राज्यपालांनी संपूर्ण मुद्दा लक्षात घेत आयोजनाच्या तारखांमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे. नुकतेच विद्यापीठाला त्यासंदर्भात पत्र प्राप्त झाले.
आता ‘इंद्रधनुष्य’चे आयोजन २२ ते २६ जानेवारी या कालावधीत होणार आहे. विद्यापीठाकडून तशी तर तयारी सुरू होतीच.
परंतु आता हा महोत्सव समोर ढकलण्यात आल्यामुळे तयारीवर काहीही परिणाम पडणार नाही. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात विद्यार्थ्यांवर परीक्षांचे किंवा अभ्यासाचे फारसे दडपण राहणार नाही. त्यामुळे ‘इंद्रधनुष्य’ची रंगत आणखी वाढेल असा विश्वास नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. निहाल शेख यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)