पावसामुळे वीज वितरण प्रणालीलाच शॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:24+5:302021-06-09T04:10:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मंगळवारी दुपारी वेगवान वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील वीज वितरण प्रणालीतील फोलपणा समोर आणला. ...

पावसामुळे वीज वितरण प्रणालीलाच शॉक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी दुपारी वेगवान वाऱ्यांसह झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील वीज वितरण प्रणालीतील फोलपणा समोर आणला. जवळपास साडेआठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अनेक तासांसाठी खंडित होता. पुरवठा सुरू व्हावा, यासाठी मोठी मोहीम राबविण्यात आल्याचा दावा महावितरणतर्फे करण्यात आला. अनेक भागांत वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र, अनेक ग्राहकांना रात्री उशिरापर्यंत अंधारातच राहावे लागले.
महावितरणतर्फे दर बुधवारी मेन्टेनन्सच्या नावाखाली अनेक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. या दरम्यान, वीजवाहिन्यांच्या आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या कापण्यात येतात. मात्र, पावसाने या दाव्यांची पोलखोल केली. पूर्ण झाड पडले, तर ती बाब समजल्या जाऊ शकते. मात्र, वाहिन्यांवर फांद्या पडल्याने मेन्टेनन्स दरम्यान खरोखरच किती फांद्या कापण्यात आल्या, याबाबत प्रश्न उपस्थितीत होत आहे.
दरम्यान, मंगळवारी वाहिन्यांवर झाड किंवा फांद्या पडल्याने त्रिमूर्तीनगर, टेलिकॉमनगर, गोपालनगर इत्यादी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. या परिसरातील साडेचार हजार ग्राहकांना फटका बसला. याच प्रकारे जयप्रकाश नगर, तसेच गायत्रीनगर भागातही वीजवाहिनीवर झाड कोसळले. नवनिर्माण सोसायटी, एकात्मतानगर, रविनगर येथील शासकीय कॉलनी येथील वीजपुरवठाही खंडित झाला. तेथील वीजपुरवठा सायंकाळी सहापर्यंत सुरू झाल्याचा दावा महावितरणने केला. मात्र, नागरिकांनी अर्धा भाग अंधारातच असल्याचा दावा केला. त्रिमूर्तीनगरचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश नागदेवते, सहायक अभियंता मकरंद फडणवीस, रत्नदीप बागडे, राहुल ललके रात्री उशिरापर्यंत काम करत होते.