पाऊस येतो अन् घरोघरी नाल्याचे पाणी साचते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST2021-07-18T04:07:19+5:302021-07-18T04:07:19+5:30
सिवरेजमुळे रामेश्वरी, भगवाननगरात समस्या : मनपाकडे तक्रार करूनही उपयोग नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत ...

पाऊस येतो अन् घरोघरी नाल्याचे पाणी साचते
सिवरेजमुळे रामेश्वरी, भगवाननगरात समस्या : मनपाकडे तक्रार करूनही उपयोग नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत; परंतु रामेश्वरी, भगवाननगर भागातील नागरिकांची पाऊस आला की चिंता वाढते. जोराचा पाऊस आला की, सिवरेज लाईनचे पाणी घराघरांत तुंबते. समस्या या दोन वस्त्यांचीच नाही, तर धंतोली झोनमधील अन्य वस्त्यांतही अशीच परिस्थिती आहे.
रामेश्वरी, भगवाननगर, हावरा पेठ, चंद्रमनीनगर, बिडी पेठ, चंद्रनगर, वसंतनगर, कुकडे लेआउट, विश्वकर्मानगर, कैलासनगर, बालाजीनगर, जोगीनगर, शताब्दी चौकालगतच्या वस्त्या, इमाम वाडा, जातटरोडी यासह प्रभागातील अन्य वस्त्यांतही नादुरुस्त सिवरेज लाइनच्या समस्या आहेत.
शहरातील दहा झोनला विभाजित करून उत्तर, मध्य आणि दक्षिण, असे तीन सिवरेज झोन तयार करून दक्षिण झोनमधील लक्ष्मीनगर, हनुमाननगर, धंतोली, नेहरूननगर भागातील सिवरेज लाइन व चेंबर दुरुस्तीच्या प्रकल्पांतर्गत ३१ कोटींच्या कामाला काही भागांत सुरुवात झाली आहे; परंतु दुरुस्तीने ही समस्या सुटणार नाही. शहरातील सिवरेज लाइन ५० ते ६० वर्षांपूर्वीच्या असल्याने लाइन बदलण्याची गरज आहे.
नादुरुस्त सिवरेजमुळे रामेश्वरी भागातील नागरिक त्रस्त असल्याची माहिती सागर डबरासे यांनी दिली. कुकडे लेआउट येथील प्रवणी कुंभारे म्हणाले, सिवरेज दुरुस्तीसाठी झोन कार्यालयाकडे तक्रार केली; परंतु अधिकारी दखल घेत नाहीत. अशीच व्यथा अन्य नागरिकांची आहे.
....
अतिक्रमणांची गंभीर समस्या
शहरातील सिवरेज लाइनवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे दुरुस्तीची कामे करता येत नसल्याने तुंबलेल्या सिवरेज लाइनची दुरुस्ती करता येत नाही. अतिक्रमणामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. सभागृहात सिवरेज लाइनवरील अतिक्रमण काढण्याचे वेळोवेळी आदेश देण्यात आले; परंतु त्यांची अंमलबजावणी होत नाही.
....
सिवरेज दुरुस्त करण्याची मागणी
प्रभाग ३३ मधील रामेश्वरी काशीनगर सम्राट अशोक कॉलनी भागातील नागरिक नादुरुस्त सिवरेजमुळे त्रस्त आहेत. या परिसरातील सिवरेज लाइन २० वर्षांपूर्वीच्या आहेत. मागील काही वर्षांत घरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सिवरेज लाइनवरील भार वाढला आहे. त्यात सिवरेज नादुरुस्त असल्याने घाण पाणी लोकांच्या घरात व रस्त्यावर साचत असल्याने सिवरेज लाइनची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.