विदर्भाकडे येणारा पाऊस पश्चिमेकडे वळला!
By Admin | Updated: July 8, 2014 21:57 IST2014-07-08T21:57:09+5:302014-07-08T21:57:09+5:30
विदर्भाकडे येणारा हा पाऊस अचानक पश्चिमेकडे वळल्याने पुन्हा घोर निराशा झाली आहे.

विदर्भाकडे येणारा पाऊस पश्चिमेकडे वळला!
अकोला : पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करणार्या शेतकर्यांना गत आठवड्यात पाऊस प्रणालीने जोर पकडल्याने दिलासा मिळाला होता; परंतु विदर्भाकडे येणारा हा पाऊस अचानक पश्चिमेकडे वळल्याने पुन्हा घोर निराशा झाली आहे. असे असले तरी अधूनमधून तुरळक पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, सार्वत्रिक पावसाचे चित्र येत्या आठवड्यात स्पष्ट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी पाऊस प्रणालीला वेग आला होता. त्यामुळे मध्य प्रदेशात चांगला पाऊस बरसला. तथापि, विदर्भाकडे येणार्या पावसावर अर्थात पाऊस प्रणालीवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे हा पाऊस पश्चिमेकडे वळला. आता जे ढगाळ वातावरण तयार झालेले आहे. हे पावसाचे ढग नाहीत. त्यामुळे आता पाऊस घेऊन येणार्या ढगांची सर्वांना प्रतीक्षा आहे. ओडिशा, छत्तीसगड आदी भागात चांगला पाऊस झाला, तर मात्र विदर्भात तो पाऊस येण्याची शक्यता असते. आपल्याकडे येणारा पाऊस हा पश्चिम बंगालच्या उपसागराकडून येणारा असल्यामुळे आपले सर्व लक्ष या भागातील पडणार्या पावसाकडे लागून आहे. हे चित्र तीन दिवसानंतर अधिक स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आमचे सर्व लक्ष आता पश्चिम बंगालच्या उपसागराकडून सशक्तपणे तयार होणार्या पाऊस प्रणालीकडे लागले असल्याचे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय हवामान केंद्राने येत्या १२ व १३ जुलैला पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या तारखांकडे लागले आहे.