आगीवर नियंत्रणासाठी रेल्वेकडे नाही यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:06 IST2021-06-04T04:06:47+5:302021-06-04T04:06:47+5:30
नागपूर : पेट्रोलने भरलेल्या वॅगन, कोळशाच्या मालगाड्या रेल्वेस्थानकावर उभ्या राहतात. अचानक आग लागल्यास अख्खे रेल्वेस्थानक खाक होण्याची भीती राहते. ...

आगीवर नियंत्रणासाठी रेल्वेकडे नाही यंत्रणा
नागपूर : पेट्रोलने भरलेल्या वॅगन, कोळशाच्या मालगाड्या रेल्वेस्थानकावर उभ्या राहतात. अचानक आग लागल्यास अख्खे रेल्वेस्थानक खाक होण्याची भीती राहते. आग लागल्यानंतर रेल्वे प्रशासन अग्निशमन विभागाला पाचारण करते. परंतु मदत पोहोचण्यास उशीर लागल्यास मोठ्या प्रमाणात जिवितहानी होऊ शकते. रेल्वेस्थानकावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्यामुळे अचानक आग लागल्यास ती विझविणार कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील १५ दिवसात रेल्वेस्थानकावर दोन वेळा आगी लागल्या. सुदैवाने लवकरच आग आटोक्यात आल्यामुळे अनर्थ टळला. भारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून रेल्वेत लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग अस्तित्वात होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच हा विभाग घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणत होता. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलीनीकरण करण्यात आले. तेव्हापासून आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी रेल्वेत स्वतंत्र विभागच अस्तित्वात नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. नागपूर रेल्वेस्थानकावर हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी आग लागल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता राहते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
.............
प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणे गरजेचे
‘रेल्वेस्थानकावर अचानक आग लागल्यास महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. त्यामुळे रेल्वेने आपला अग्निशमन विभाग सुरू करून प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.’
-बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र
........