बॉम्बच्या अफवेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ
By Admin | Updated: August 13, 2016 02:26 IST2016-08-13T02:26:23+5:302016-08-13T02:26:23+5:30
नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धडकला.

बॉम्बच्या अफवेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ
स्वातंत्र्यदिनानिमित्त मॉक ड्रील : १५ मिनिटात शोधून काढली स्फोटके
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धडकला. लगेच बीडीडीएस पथक घटनास्थळी रवाना झाले. प्लॅटफार्म क्रमांक १ ची श्वान पथकाने पाहणी करून अवघ्या १५ मिनिटात स्फोटकांचा शोध घेतला. यामुळे काही वेळासाठी प्रवासी घाबरले होते. परंतु स्फोटकांचा शोध घेतल्यानंतर ही ‘मॉक ड्रील’ असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांच्यावतीने मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. यात बॉम्ब शोधक व नाशक पथक किती ‘अलर्ट’ आहे याची चाचपणी करण्यात आली. दरम्यान दुपारी ४.१० वाजता लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी धडकला.
लगेच बॉम्ब शोधक व नाशक पथकास घटनास्थळी रवाना करण्यात आले. रिना आणि टायगर या श्वानांनी तपासकार्य सुरू केले. त्यानंतर हे श्वान सेकंड क्लास वेटिंग हॉलमध्ये गेले.
तेथे प्रवासी बसले होते. श्वानांनी १५ मिनिटात वेटिंग रुममध्ये ठेवलेली स्फोटके हुडकून काढली.
ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) चंदनसिंग बायस, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश पिंपळे, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे उपनिरीक्षक धम्मदिप इंगळे, नितीन अवधूत, मनोज गुप्ता यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)