लाच घेतल्याच्या आरोपातून रेल्वे अभियंता निर्दोष
By Admin | Updated: May 21, 2016 03:02 IST2016-05-21T03:02:32+5:302016-05-21T03:02:32+5:30
वैद्यकीय रजा मंजुरीसाठी आपल्याच कर्मचाऱ्याकडून दोन हजाराची लाच घेतल्याच्या आरोपातून सीबीआय विशेष न्यायालयाचे ...

लाच घेतल्याच्या आरोपातून रेल्वे अभियंता निर्दोष
सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल
नागपूर : वैद्यकीय रजा मंजुरीसाठी आपल्याच कर्मचाऱ्याकडून दोन हजाराची लाच घेतल्याच्या आरोपातून सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. डी. शुक्ला यांच्या न्यायालयाने दक्षिणपूर्व रेल्वेच्या आरोपी वीज अभियंत्याची निर्दोष सुटका केली.
संदेश शर्मा, असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे. आरोपीने २३ एप्रिल २००९ रोजी आपला कर्मचारी अविनाश नारनवरे याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली होती. सीबीआयच्या पथकाने आरोपीला अटक केली होती. आरोपीने ही रक्कम रेल्वेस्थानकाजवळील जयस्तंभ चौकात स्वीकारल्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला होता. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासह रेल्वेस्थानकावर उभा असता सीबीआयचे अधिकारी कुजूर, कृष्णकुमार, राजीव ऋषी आणि पथकाने त्याला पकडले होते. कारवाईच्या वेळी झटापट होऊन दोन अधिकारी जखमी झाले होते. आरोपीचे हात तपासण्यात आले असता ते जांभळे झाले होते. आरोपीजवळ ही रक्कम सापडली नव्हती. ती त्याच्या घरी टीव्हीखाली होती.
ती जप्त करण्यात आली होती. न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा देत निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपीच्यावतीने अॅड.चंद्रशेखर जलतारे तर सीबीआयच्यावतीने अॅड. वर्मा यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)