वाघाच्या अधिवासावर दरोडा

By Admin | Updated: November 18, 2015 03:02 IST2015-11-18T03:02:28+5:302015-11-18T03:02:28+5:30

एकिकडे उपराजधानीला व्याघ्र राजधानीचा दर्जा मिळावा, येथील वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी आटापिटा केला जात असताना,...

Raid on the premises of Tiger | वाघाच्या अधिवासावर दरोडा

वाघाच्या अधिवासावर दरोडा

सोलर कंपनीचा डाव : कशी होणार व्याघ्र राजधानी?
जीवन रामावत नागपूर
एकिकडे उपराजधानीला व्याघ्र राजधानीचा दर्जा मिळावा, येथील वाघांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी आटापिटा केला जात असताना, एका खासगी सोलर कंपनीने नागपूरपासून काहीच अंतरावरील कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील वन जमीन (जंगल) आपल्या घशात घालण्याचा डाव आखला आहे. विशेष म्हणजे, ते जंगल वाघासह अनेक वन्यप्राण्यांचे अधिवास आहे. त्यामुळे ती कंपनी वन जमिनीवर नव्हे, तर थेट वाघाच्या अधिवासावर दरोडा घालत असल्याच्या वन्यजीवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड, असे त्या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मागील १९९५ पासून येथे कार्यरत आहे. परंतु काहीच दिवसांपूर्वी कंपनीने आपला विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीला अतिरिक्त जागेची गरज आहे. त्यानुसार कंपनीने वन विभागाकडे शेजारीच असलेली ८७.९७ हेक्टर वन जमिनीसाठी मागणी केली. माहिती सूत्रानुसार या ८७.९७ हेक्टर वन क्षेत्रामध्ये ५८.८६ हेक्टर राखीव वन, २७.१६ हेक्टर संरक्षित वन व १.९५ हेक्टर झुडपी जंगलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने कंपनीच्या त्या प्रस्तावावर अध्ययनासाठी यापूर्वी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने मागील २५ मार्च २०१५ ते १४ एप्रिल २०१५ दरम्यान संबंधित वनक्षेत्रात पहिला सर्वे केला. त्यानंतर समितीने २० एप्रिल २०१५ रोजी नागपूरचे तत्कालीन उपवनसंरक्षक भट यांच्याकडे अहवाल सादर केला. समितीने त्या अहवालात प्रस्तावित वन क्षेत्रात वाघ, चांदी अस्वल, मोर, माकड, जंगली कुत्री, मसन्या उद, चितळ, सांभर, नीलगाय, रानडुक्कर, भेडकी, हरीयल, घुबड व पिसा अशा विविध वन्यप्राण्यांचा अधिवास असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. परंतु असे असताना उपवनसंरक्षक भट यांनी त्या अहवालातील ‘वाघ’ वगळून २७ एप्रिल २०१५ रोजी मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्याकडे चुकीचा अहवाल पाठविला. त्यानंतर २८ सप्टेंबर २०१५ रोजी याच मुद्यावर वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीत विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप बाजोरिया यांनी प्रस्तावित वनक्षेत्रात वाघाचा अधिवास असून, संबंधित वन अधिकाऱ्याने अहवालात हेराफेरी केल्याकडे वनमंत्र्यांचे लक्ष वेधले होते.
वनअधिकाऱ्याची बनवाबनवी
सन २०१४ च्या प्रगणनेनुसार बोर लँडस्केपमध्ये १२ वाघांची संख्या दाखविण्यात आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाच्या लँडस्केपचा अर्थ हा बोर क्षेत्रासह त्याला लागून असलेली नागपूर व वर्धा वन विभागाचे परिक्षेत्र असा होतो. त्या लँडस्केपमध्ये नागपूर वन विभागातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर व कोंढाळी हा भाग येतो मात्र असे असताना तत्कालीन उपवनसंरक्षक भट यांनी या क्षेत्रापासून बोर हे १५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असल्याने सदर क्षेत्र बोर लँडस्केपमध्ये येत नसल्याचा आपल्या अहवालात उल्लेख केला होता. शिवाय त्यांनी भारतीय वन्यजीव संस्थानव्दारे जारी केलेल्या कॉरिडोरची माहिती या कार्यालयात उपलब्ध नाही, अशीही बतावणी केली होती. वास्तविक ती सर्व माहिती भारतीय वन्यजीव संस्थानच्या वेबसाईटवर नकाशासह उपलब्ध केली आहे.

Web Title: Raid on the premises of Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.