राहुलच्या भेटीने बळ सुरक्षा यंत्रणेची तारांबळ!
By Admin | Updated: April 30, 2015 02:21 IST2015-04-30T02:21:04+5:302015-04-30T02:21:04+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी किसान पदयात्रेसाठी बुधवारी रात्री दिल्लीहून विमानाने नागपुरात दाखल झाले.

राहुलच्या भेटीने बळ सुरक्षा यंत्रणेची तारांबळ!
नागपूर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी किसान पदयात्रेसाठी बुधवारी रात्री दिल्लीहून विमानाने नागपुरात दाखल झाले. विमानतळाबाहेर राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच चढाओढ झाली. कार्यकर्त्यांचा उत्साह अन् घोषणा पाहून राहुल गाडीत न बसता थेट कार्यकर्त्यांच्या भेटीला गेले. यामुळे कार्यकर्त्यांना आणखीनच बळ मिळाले. राहुल गांधींशी हात मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सुरक्षा कठडे तोडले. यावेळी सुरक्षा यंत्रणेची पुरती तारांबळ उडाली. या सर्व गदारोळात तब्बल १० मिनिटे राहुल गांधी यांनी भेटीसाठी ताटकळत असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत चालत जात हात मिळविला. शेवटी गाडीत बसून रविभवनसाठी रवाना झाले.
राहुल गांधी यांचे रात्री ९.४० वाजता आगमन झाले. विमानतळावर महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सर्वप्रथम स्वागत केले. यानंतर चव्हाण यांनी स्वागतासाठी रांगेत उभ्या असलेल्या सर्व नेत्यांशी भेट घालून दिली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, बाला बच्चन, माजी खा. विलास मुत्तेमवार, खा. अविनाश पांडे, खा. राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विश्वजित कदम, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, आ. विजय वडेट्टीवार, प्रभावती ओझा, अतुल कोटेचा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. नेत्यांशी भेटीनंतर राहुल ९.५० वाजता विमानतळाबाहेर आले. जीन्स व टी-शर्ट अशा साध्या वेशात असलेल्या राहुल गांधी यांना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘किसानों के सन्मान में, राहुलजी मैदान में’ अशा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून राहुल गांधी यांनी थेट गाडीत बसणे टाळून पुढे चालत जात सर्वांची भेट घेतली. (सविस्तर वृत्त/४)
सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी एकच बॅरिकेट अन् दोरी
विमानतळावर राहुल गांधी व्हीआयपी गेटमधून बाहेर येणार होते. या गेटच्या समोरच त्यांची गाडी लावण्यात आली होती. गाडीपासून पाच फूट अंतरावर बॅरिकेट लावण्यात आले होते. या बॅरिकेटपासून १५ फूट अंतरावर एक दोरी बांधून कार्यकर्त्यांना थांबविण्यात आले होते. मात्र, राहुल यांच्या आगमनाची वेळ येताच कार्यकर्ते दोरी ओलांडून बॅरिकेटजवळ पोहचले. कार्यकर्त्यांना आवरण्यात पोलीस कमी पडले. राहुल यांचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत कठड्यावर चढले. काहींनी तर गाडीपर्यंत हात लांबविले. यातच सुरक्षा कठडे पुढे ढकलल्या गेले. कार्यकर्त्यांमध्ये ढकलाढकली सुरू झाली. यात काही कार्यकर्ते व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जखमी झाले. यावेळी पोलिसांसह सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. पण राहुल गांधी यांनी गाडीत न बसता कार्यकर्त्यांपर्यंत हात मिळवीत पायी चालणे सुरू केल्यामुळे पोलिसांना परिस्थिती हाताळण्यास मदत झाली. घडलेला प्रसंग पाहता राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचे दिसून आले.