राहुल गांधींचे आंदोलन नैराश्यातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 02:49 IST2015-04-29T02:49:21+5:302015-04-29T02:49:21+5:30
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जमीन अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठीचे आंदोलन म्हणजे निराश झालेल्या नेत्याचे आंदोलन आहे.

राहुल गांधींचे आंदोलन नैराश्यातून
नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे जमीन अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठीचे आंदोलन म्हणजे निराश झालेल्या नेत्याचे आंदोलन आहे. लोकसभेतील पराभवाच्या नैराशातून ते काहीतरी करीत असल्याचा भास निर्माण करीत आहेत. या आंदोलनाशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केली.
नागपुरात एका लग्न समारंभासाठी आले असता, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. पक्षाचे केंद्रीय संघटनमंत्री रामलाल व व्ही. सतीश उपस्थित होते. या वेी दानवे म्हणाले, औरंगाबाद महापालिका निवडणूक शिवसेना-भाजप युतीने संयुक्तपणे लढविली होती. त्यानुसार महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी बैठकीत सूत्र ठरले असून युतीचाच महापौर होईल. शिवसेनेचे नगरसेवक संख्यने अधिक असल्याने पहिले दीड वर्ष त्यांच्याकडे महापौरपद राहील. त्यानंतर एक वर्ष भाजपचा महापौर असेल. त्यापुढील अडीच वर्ष पुन्हा शिवसेनेचा महापौर असेल. उपमहापौरपद चार वर्ष भाजपकडे तर एक वर्ष शिवसेनेकडे राहील. स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वर्ष भाजपकडे तर दोन वर्ष सेनेकडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे आदींनी दानवे यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)