रागदारीच्या स्वरांचा चिमुकल्यांचा ‘रागरंग घनश्याम’
By Admin | Updated: September 14, 2014 01:06 IST2014-09-14T01:06:57+5:302014-09-14T01:06:57+5:30
सांदीपनी शाळेच्या स्थापनादिनानिमित्त शाळेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात श्री श्री पर्वचे आयोजन करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगावर इयत्ता पहिली ते चौथीच्या

रागदारीच्या स्वरांचा चिमुकल्यांचा ‘रागरंग घनश्याम’
सांदीपनी स्कूलचे आयोजन : श्री श्री पर्व सादरीकरण
नागपूर : सांदीपनी शाळेच्या स्थापनादिनानिमित्त शाळेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात श्री श्री पर्वचे आयोजन करण्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगावर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी भावपूर्ण सादरीकरण करून याप्रसंगी उपस्थितांची दाद घेतली. कृष्णाच्या नटखट लीला, सुदामाची भेट, गोपिकांना भंडावून सोडणे आणि माता यशोदेकडे तक्रार केल्याने त्रासून गेलेली पण कृष्णावर निरातिशय प्रेम करणारी आई, असे अनेक प्रसंग यावेळी रागदारीच्या संगीतासह तयारीने सादर करण्यात आले. लहान मुलांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात रसिकही गुंतले.
हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. रंगीबेरंगी पोशाख, कृष्णाच्या वेशभूषेतील मुले आणि गोपिकांचा वेश घेतलेल्या लहान मुलामुलींनी यावेळी मोहक सादरीकरणाने उपस्थितांची दाद घेतली. रागमालिकांची मदत घेत या कार्यक्रमात एक कथा गुंफण्यात आली होती. स्क्रीनवर काही मुलांनी अभिनित केलेले दृश्य साकारण्यात आले आणि रागांची माहिती देत वेगवेगळ्या रागांवर आधारित गीतांवर मुलांनी मोहक नृत्याने यावेळी उपस्थितांना जिंकले. मालकंस, नटभैरव, तोडी, हंसध्वनी, मधुमास सारंग, यमन आदी रागांवर आधारित गीतातून कृष्णचरित्राभोवती ही गीते गुंफलेली होती.
गीतांचा भाव समजून नृत्य बसविण्यात आली होती. त्यात लहान मुलांनीही अतिशय प्रामाणिकपणे नृत्य सादर करून गीतांचा आशय उपस्थितांपर्यंत सहजपणे पोहोचविला. युद्धात अर्जुन शस्त्र टाकतो तेव्हा कृष्ण त्याला गीतेचे तत्त्वज्ञान सांगतो. या आशयाच्या गीतावरील नृत्याने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. मुलांच्या निरागस सादरीकरणाने हा कार्यक्रम रंगतदार ठरला. कार्यक्रमाला शाळेच्या संचालिका राजश्री जिचकार आणि विश्वस्त रमेश गिरडे, प्रमोद जयस्वाल, राजू अकोलकर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. नृत्य गुरु श्रीमती माडखोलकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी लता थेरगावकर, मृणालिनी काळे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)