नागपूर : मागील काही काळापासून देशभरात विविध कारणांसाठी कर्ज काढण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून जनसामान्यांना 'टार्गेट' करण्यात येत आहे. स्वस्त व्याजदरात झटपट कर्ज देण्याचे आमिष दाखवून बोगस अॅपच्या जाळ्यात नागरिकांना ओढण्यात येते आणि त्यानंतर फोन हॅक करून बँक खातेच साफ करण्यात येते. नागपूरसह देशभरात असे अनेक प्रकार समोर आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सायबर गुन्हेगारांचे 'किंगपिन' चीनसारख्या देशात बसले असतात व त्यांचे पंटर्स भारतात राहून हे रॅकेट संचालित करत असतात. त्यामुळे अशा अॅप्सच्या मोहजालापासून दूर राहणे आवश्यक झाले आहे.
अनेकदा अधिकृत बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज काढण्याची प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असते. अनेकांकडे तर आवश्यक दस्तावेजदेखील नसतात. त्यामुळे खासगी फर्म्सकडून कर्ज काढण्यासाठी धाव घेतली जाते. मात्र, तेथे व्याजदर जास्त असतो आणि कर्ज वेळेत मिळेल की नाही याची शाश्वती नसते. सायबर गुन्हेगारांकडून विविध अॅप्सच्या माध्यमातून कर्ज देण्याचे जाळे रचले जाते. एकदा का समोरील व्यक्तीने अॅप इन्स्टॉल केले की त्यावेळी गुन्हेगार त्याच्या फोनचा अॅक्सेस घेतात आणि त्यानंतर त्यातील सर्व डेटा सायबर गुन्हेगारांकडे जातो. फोनमधील बँकांच्या अॅप्स किंवा यूपीआयचे पासवर्ड परस्पर बदलून मग बँक खात्यातील रक्कम वळती केली जाते. जोपर्यंत समोरील व्यक्तीला हा प्रकार कळतो तोपर्यंत उशीर झाला असतो.
'शेल' कंपन्यांच्या आड कारभारसायबर गुन्हेगारांकडून चक्क चार्टर्ड अकाउंटंटचादेखील यासाठी वापर करण्यात येत असल्याची बाब उत्तराखंडमधील एका रॅकेटमध्ये समोर आली आहे. गुन्हेगारांकडून अशा वित्तीय तज्ज्ञांचा वापर करून शेल कंपन्या उघडण्यात येतात. त्या कंपन्यांच्या संचालकपदी चीन किंवा बाहेरील देशांचे नागरिक असलेले गुन्हेगारांचे प्रतिनिधी असतात. नागरिकांच्या खात्यातून वळते झालेले पैसे या शेल कंपन्यांच्या माध्यमातून फिरविण्यात येतात.
फोटो मॉफिंग करून ब्लॅकमेलिंगफोनचे पूर्ण नियंत्रण गुन्हेगारांकडे गेल्यानंतर गॅलरीतील फोटो व इतर संवेदनशील डेटाचा दुरुपयोग सुरू होतो. बरेचदा फोटो मॉफिंग करून समोरील व्यक्तीला ब्लॅकमेल केले जाते. ते फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना शेअर करण्याची धमकीदेखील दिली जाते. नागपुरातदेखील काही तरुणींसोबत असे प्रकार घडलेले आहेत.