पिस्तुलधारी लुटारूंचा हैदोस
By Admin | Updated: February 13, 2015 02:16 IST2015-02-13T02:16:58+5:302015-02-13T02:16:58+5:30
गणेशपेठ, गांधीबागसारख्या वर्दळीच्या भागात तब्बल एक तास हैदोस घालून पिस्तुलधारी आरोपींनी एका व्यापाऱ्याला लुटले. एकाला लुटण्याचा प्रयत्न केला तर एका व्यक्तीला मारहाण केली.

पिस्तुलधारी लुटारूंचा हैदोस
नागपूर : गणेशपेठ, गांधीबागसारख्या वर्दळीच्या भागात तब्बल एक तास हैदोस घालून पिस्तुलधारी आरोपींनी एका व्यापाऱ्याला लुटले. एकाला लुटण्याचा प्रयत्न केला तर एका व्यक्तीला मारहाण केली. या घटनेमुळे शहर पोलिसांच्या सक्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले आहे.
सराफा व्यापारी रामू शंकरराव हरडे (वय ५५, चिटणीस पार्क) हे आज सकाळी ८.३० वाजता गांधीसागर तलावाच्या बाजूला मॉर्निंग वॉक करीत होते. तेवढ्यात मोटरसायकलवर (क्र. ०९५५) तीन आरोपी आले. ‘शर्माजीचे घर कुठे आहे’, असे विचारत त्यांनी हरडे यांना थांबवले. त्यानंतर पिस्तूलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत हरडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी, लॉकेट आणि ब्रासलेट असे १ लाख ६३ हजारांचे दागिने हिसकावून घेतले. आरोपी पळून गेल्यानंतर हरडे यांनी गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा दाखल केला.
या घटनेच्या एक तासापुर्वी अशीच एक घटना गांधीबागेत घडली. कापड व्यापारी शांतिलाल निशनदास पुनियानी (वय ७०) हे गांधीबागमधील हॉटेल अन्नपूर्णाजवळ राहतात. सेवाभावी पुनियानी अनेक सामाजिक संघटनांशी जुळलेले आहेत. नेहमीप्रमाणे ते आज सकाळी ७.३० च्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत होते. त्यांना धारस्कर मार्गावरील भगवान नृसिंह मंदिरासमोर तीन आरोपींनी अडवले. आम्ही सीआयडीची माणसं आहोत, असे आरोपी म्हणाले. पुनियानी यांनीओळखपत्र दाखवायला सांगितले असता आरोपींनी ‘रोकडा निकालो, वर्ना ...’ असे म्हणून लगेच पिस्तूल काढले. एवढ्यात तेथून जाणारे सुरेंद्र धनचंद जैन यांना पुनियानी दिसले. त्यांच्या बाजूला असलेल्या व्यक्तींचा संशय आल्यामुळे जैन थांबले. त्यांनी आरोपींना विचारणा केली असता, आरोपींनी जैन यांना मारहाण केली आणि पिस्तुलचा धाक दाखवून पळवून लावले. ते पाहून बाजूच्या अनेकांनी तिकडे धाव घेतली. त्यामुळे आरोपींनी पल्सरवरून पळ काढला. दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या जैन यांनी पोलिसांना फोनवरून घटनेची माहिती दिली. मात्र तहसील पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचेपर्यंत गणेशपेठेत लुटमारीची घटना घडली. (प्रतिनिधी)