वकिली व्यवसायात सामाजिक दृष्टिकोन ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 23:20 IST2018-06-27T23:18:33+5:302018-06-27T23:20:05+5:30
प्रत्येक पक्षकार वकिलाला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे वकिली व्यवसाय करताना केवळ पैशाच्या मागे न धावता सामाजिक दृष्टिकोन अवश्य बाळगा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी नवोदित वकिलांना केले.

वकिली व्यवसायात सामाजिक दृष्टिकोन ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत बुधवारी न्या. कर्णिक यांचे ‘निर्णयामध्ये सामाजिक दृष्टिकोन’ विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्यांनी नवोदित वकिलांना करिअरमध्ये दिशादर्शक ठरणारे मार्गदर्शन केले. कायदा मोडून निर्णय देणे म्हणजे न्याय नव्हे. न्याय करताना नवीन नियमांची निर्मिती व्हायला हवी. त्यातून भविष्यातील न्यायदानाचा मार्ग सोपा होतो. न्यायासाठी झगडताना प्रत्येकवेळी जुने निवाडे उपयोगात येतीलच असे नाही. प्रकरणातील तथ्येही अनेकदा न्यायदानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे वकिलांनी जुन्या निवाड्याची चिंता करीत बसू नये. बरेचदा छोटे प्रकरणही मनाला समाधान देऊन जाते. कारण, त्या प्रकरणामध्ये शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात असे न्या. कर्णिक यांनी पुढे बोलताना सांगितले. त्यांनी वैयक्तिक जीवनात काही प्रेरणादायक अनुभवही कथन केले.
संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी न्या. कर्णिक यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक तर, सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम उच्च न्यायालयाच्या सभागृहात पार पडला. अनेक नवोदित वकिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला.