संघाच्या हस्तक्षेपामुळे सामाजिक सलोख्याला धक्का
By Admin | Updated: August 31, 2014 01:09 IST2014-08-31T01:09:47+5:302014-08-31T01:09:47+5:30
देशातील लोकांनी विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सत्ता दिली. शंभर दिवसाचा कालावधी मोठा नाही. परंतु सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये राष्ट्रीय

संघाच्या हस्तक्षेपामुळे सामाजिक सलोख्याला धक्का
तारिक अन्वर : सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल
नागपूर : देशातील लोकांनी विश्वासाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सत्ता दिली. शंभर दिवसाचा कालावधी मोठा नाही. परंतु सरकारची चुकीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सरकारमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक्षेप वाढल्याने देशातील सामाजिक सलोख्याला धक्का पोहचल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांनी शनिवारी केला. पत्रकार भवनात आयोजित वार्तालाप कार्यक्र मात ते बोलत होते.
अटल बिहारी वाजपेयी भाजपचे पंतप्रधान होते परंतु त्यांनी वादग्रस्त मुद्यांना बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकारकडून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. हे देशासाठी घातक आहे,, असे मत अन्वर यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला ३१ टक्के मते मिळाली तर विरोधात ६९ टक्के मते पडली. असे असतानाही भाजपच्या २८८ जागा निवडून आल्या. मुस्लीम समाजाच्या लोकांनी भाजपला मते दिली नाही. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मतदान केले.
काही दिवसातच लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. याचा परिणाम नुक त्याच पार पडलेल्या काही राज्यातील पोटनिवडणुकीत दिसून आला. लालूप्रसाद यादव व नितीश कुमार यांच्यासारखे धर्मनिरपेक्ष विचाराचे नेते एकत्र आल्याचे अन्वर म्हणाले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष अजय पाटील, वेदप्रकाश आर्य, राजू नागूलवार, रमेश फुले, पत्रकार भवन ट्रस्टचे प्रदीप मैत्र यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मोदींचे विरोधीमुक्त धोरण
सरकारइतकेच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाही. एकूण जागांच्या १० टक्के निवडून आल्या तरच विरोधी पक्षनेतेपद देता येईल, असे घटनेत कुठेही नमूद नाही. सर्वोच्च न्यायालयानेही विरोधी पक्षनेत्यासंदर्भात सरकारला निर्देश दिलेले आहे. परंतु मोदींना विरोधीमुक्त, विरोधमुक्त सरकार चालवायचे असल्याचे अन्वर म्हणाले.
(प्रतिनिधी)