मॉरिसच्या प्रतिष्ठेला धक्का
By Admin | Updated: June 18, 2016 02:17 IST2016-06-18T02:17:45+5:302016-06-18T02:17:45+5:30
विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (मॉरिस) संस्कृत विभागातील प्राध्यापकाच्या...

मॉरिसच्या प्रतिष्ठेला धक्का
प्राध्यापकाचा त्रास : विद्यार्थिनी पोहोचल्या ठाण्यात
नागपूर : विदर्भाच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेत (मॉरिस) संस्कृत विभागातील प्राध्यापकाच्या असभ्य वर्तनामुळे संस्थेत वादळ उठले आहे. या प्राध्यापकामुळे त्रस्त असलेल्या विद्यार्थिंनींनी न्यायासाठी शुक्रवारी थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. प्राध्यापकाच्या असभ्य वर्तनाचा वाद विद्यापीठातही पोहोचला आहे. तक्रारकर्त्या विद्यार्थिनी एम.ए.(संस्कृत) शेवटच्या वर्षात या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थिंनींना संस्कृत विभागाचे विभागप्रमुख डॉ. ओमकुमार टोम्पे यांच्याकडून वर्षभर चुकीची वागणूक देण्यात आली. आपणास मी परीक्षेत अनुत्तीर्ण करील, अशी सातत्याने धमकी टोम्पे यांच्याकडून देण्यात येत होती. मात्र शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या विद्यार्थिनी गप्प बसल्या. प्राध्यापकाकडून होणाऱ्या त्रासाची त्यांनी संस्थेच्या संचालकांकडे मध्यल्या काळात तक्रारकेली होती. मात्र याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप प्रज्ञा लांडे, एरिना बालपांडे, रोशनी वेरुळकर, कल्याणी चवरे या विद्यार्थिंनींनी केला आहे. अलीकडे विद्यापीठाच्यावतीने एम.ए.संस्कृत विषयाचा निकाल जाहीर झाला आहे. यात या विद्यार्थिंनींना महाविद्यालयाकडून घेण्यात आलेल्या इंटर्नल परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या लेखी परीक्षेत चांगले गुण मिळाले असतानाही प्राध्यापक टोम्पे यांनी आपल्याला इंटर्नल आणि मौखिक परीक्षेत अनुत्तीर्ण केल्याचे लक्षात आल्यावर चारही मुलींनी संस्थेचे संचालक प्रा.भाऊ दायदार यांचे कार्यालय गाठले. दायदार यांनी याप्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन या विद्यार्थिंनींना दिले. शैक्षणिक नुकसान होऊ नये, या भीतीने त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती प्र-कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी गुरुवारी दिली. मात्र इंटर्नल परीक्षेचे गुण महाविद्यालयाकडून पाठविण्यात येत असल्याने याप्रकरणात संस्थेच्या संचालकांनी लक्ष घालावे, या विद्यापीठामार्फत या प्रकरणाची माहिती मागविण्यात येईल, असे आश्वासन या विद्यार्थिंनींना देण्यात आले. मात्र प्रशासकीय कारवाईत होणारा विलंब लक्षात घेता शुक्रवारी या विद्यार्थिंनींनी पालकांसह सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. यात प्रा.ओमकुमार टोम्पे यांच्याकडून देण्यात आलेल्या असभ्य वर्तणुकीचे कथन त्यांनी पोलीस अधिकाऱ्यापुढे केले. प्राध्यापक टोम्पे आम्हाला क्रिमिनल आहात असे सांगत परीक्षेत अनुत्तीर्ण करण्याची सातत्याने धमकी देत असल्याचे या विद्यार्थिंनींनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)
प्रा.ओमकुमार टोम्पे यांच्याकडून होणाऱ्या वर्तनाची तक्रार विद्यार्थिंनींनी दिली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच योग्य ते सांगता येईल.
- प्रा.भाऊ दायदार,
संचालक, मॉरिस
मी कर्तव्याशी प्रामाणिक आहे. माझ्याविरुद्ध करण्यात आलेली तक्रार चुकीची आहे. परीक्षकाला गोपनीयतेचा भंग करता येत नाही. त्यामुळे काही बाबी सर्वाजनिक करता येणार नाही. मात्र वरिष्ठांना याबाबत वस्तुस्थिती सांगेल.
- प्रा.ओमकुमार टोम्पे