खरेदी प्रस्तावाला सुनील केदार यांनी मंजुरी दिली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:11 IST2021-08-21T04:11:36+5:302021-08-21T04:11:36+5:30

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रकमेतून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्याच्या प्रस्तावाला तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार (राज्याचे क्रीडा ...

The purchase proposal was approved by Sunil Kedar | खरेदी प्रस्तावाला सुनील केदार यांनी मंजुरी दिली होती

खरेदी प्रस्तावाला सुनील केदार यांनी मंजुरी दिली होती

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रकमेतून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्याच्या प्रस्तावाला तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार (राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री) यांनी मंजुरी दिली होती, असे बयान तपास अधिकारी किशोर बेले (सेवानिवृत्त उप-अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण) यांनी सरतपासणीदरम्यान दिले.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा खटला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुरू आहे. सहायक सरकारी वकील एल. एस. गजभिये यांनी बेले यांची सरतपासणी घेतली. दरम्यान, बेले यांनी या घोटाळ्याची विस्तृत माहिती न्यायालयाला दिली. लेखापरीक्षक भाऊराव असवार यांनी बँकेत १५३.०४ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याची तक्रार दिल्यानंतर सुनील केदार व इतर आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला. पुढे, बँकेमधून सरकारी प्रतिभूती खरेदी-विक्री व्यवहाराची सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली. त्यानुसार, सरकारी प्रतिभूती खरेदी करण्याच्या प्रस्तावाला महाव्यवस्थापक अशोक चौधरी यांनी अनुमोदन दिले होते तर, केदार यांनी मंजुरी दिली होती. या व्यवहाराच्या कागदपत्रांवर होम ट्रेड कंपनीच्या वतीने संजय अग्रवाल, सुबोध भंडारी व नंदकिशोर त्रिवेदी यांनी, इंद्रमणी मर्चंट्सच्या वतीने श्रीप्रकाश पोद्दार यांनी, सेंच्युरी डीलर्सच्या वतीने महेंद्र अग्रवाल यांनी, गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या वतीने केतन सेठ यांनी तर, सिंडीकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या वतीने अमित वर्मा यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, असे बेले यांनी सांगितले.

याशिवाय बँकेने होम ट्रेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर केले होते. हा व्यवहार १४ व १५ सप्टेंबर २००० या केवळ दोन दिवसांत करण्यात आला. यासंदर्भात केदार यांनी सात संचालकांच्या स्वाक्षरीने ठराव पारित केला होता. त्यानंतर या रकमेतून होम ट्रेड कंपनीचे प्रत्येकी ८०० रुपये दराने पाच लाख शेअर्स खरेदी करण्यात आले. कंपनी हे शेअर्स एक वर्षानंतर प्रत्येकी ९६० रुपये दराने परत खरेदी करेल असे ठरले होते. तसेच, सुरक्षा म्हणून वेज इंडिया या कंपनीचे १३ लाख ५० हजार शेअर्स बँकेकडे ठेवण्यात येणार होते. या व्यवहारात कंपनीचे संचालक संजय अग्रवाल यांनी बँकेला पुढील एक वर्षाच्या तारखांचे तीन धनादेश दिले होते. त्यापैकी एक धनादेश ४० कोटी रुपयांचा तर, दोन धनादेश प्रत्येकी चार कोटी रुपयांचे होते. याशिवाय संजय अग्रवाल, केतन सेठ व नंदकिशोर त्रिवेदी हे प्रत्येकी १६ कोटी रुपयांची वैयक्तिक हमी देणार होते. संजय अग्रवालने न्यायालयात शरणागती पत्करल्यानंतर होम ट्रेड कंपनीच्या कार्यालयातील कागदपत्रे जप्त करण्यात आली. जिल्हा बँकेेने होम ट्रेड कंपनीला रक्कम वळती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेला वेळोवेळी आठ फॅक्स पाठविले होते. त्यानुसार होम ट्रेडला सुमारे १८५ कोटी रुपये वळते करण्यात आले, अशी माहितीही बेले यांनी दिली.

-----------------

उलट तपासणी सुरू

किशोर बेले यांच्या उलट तपासणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. केदार यांच्या वतीने वरिष्ठ ॲड. सुबोध धर्माधिकारी यांनी बेले यांची उलट तपासणी घेतली. दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी चौधरीच्या वतीने ॲड. अशोक भांगडे बेले यांची उलट तपासणी घेणार असून, त्यासाठी त्यांना २४ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली.

Web Title: The purchase proposal was approved by Sunil Kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.