पूरण मेश्राम नवे कुलसचिव

By Admin | Updated: May 23, 2015 02:36 IST2015-05-23T02:36:07+5:302015-05-23T02:36:07+5:30

सत्तासंघर्षाच्या कुलगीतुऱ्यात गुरुवारी परीक्षा नियंत्रकाची निवड थांबली.

Puran Meshram new registrar | पूरण मेश्राम नवे कुलसचिव

पूरण मेश्राम नवे कुलसचिव

नागपूर विद्यापीठ : राजकारण दूर सारत एकमताने झाली निवड
ंनागपूर : सत्तासंघर्षाच्या कुलगीतुऱ्यात गुरुवारी परीक्षा नियंत्रकाची निवड थांबली. कुलसचिवपदी ए. पी. जोशी की ए. डी. जोशी ? असा एक्झिट पोल असताना विद्यापीठाची नाडी ओळखणारे विद्यमान वित्त व लेखा अधिकारी पूरण मेश्राम यांची विद्यापीठाचे नवे कुलसचिव म्हणून निवड समितीने एकमताने निवड केली. परीक्षा नियंत्रकाची निवड करताना विद्यापीठातील राजकीय पारा ४७ अंशाच्यावर होता. शुक्रवारी कुलसचिवपदासाठी झालेल्या मुलाखतीत दुपारपर्यंत सत्तासंघर्ष असला तरी ‘ कुल मार्इंड’ लावत गुणवत्तेच्या आधारावर मेश्राम यांची कुलसचिवपदी निवड करण्यात यावी, असे मत सत्तापक्षातील निवड समितीच्या सदस्यांनी मांडले.
गुरुवारी झालेल्या परीक्षा नियंत्रक निवडीत सत्तापक्ष आणि उर्वरित निवड समिती सदस्यांत मतभेद झाल्यामुळे ‘टायब्रेकर’ झाला व परत फेरप्रक्रिया राबविण्याची वेळ आली. विद्यापीठात सुपर पॉवर असलेल्या कुलसचिव पदासाठी १३ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु यातील १२ उमेदवारच प्रत्यक्ष उपस्थित राहिले. प्रत्येक उमेदवाराने निवड समितीसमोर ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण दिले व त्यानंतर मुलाखती झाल्या.
याच्या आधारावर निवड समितीने सर्वोत्तम २ उमेदवार निवडले. यात डॉ.पूरण मेश्राम व विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.श्यामसुंदर भोगा यांचा समावेश होता. निवड समितीचे अध्यक्ष व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सर्वांची मते जाणून घेतली. सर्व सदस्यांनी डॉ.मेश्राम यांच्या नावालाच अनुमोदन दिले व एकमताने त्यांची निवड झाली. सोमवारी ते पदभार स्वीकारतील.
विद्यापीठाच्या विकासावर भर
नागपूर विद्यापीठाला ‘अ’ दर्जा मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाकडून अपेक्षा फार वाढल्या आहेत. विद्यापीठाचा दर्जा आणखी वाढावा यासाठी प्रशासनाची मोठी भूमिका राहणार आहे. विशेषत: नव्या आव्हानांचा सामना करत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना विकासात्मक वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. विद्यापीठात बरीच वर्षे काम केल्यामुळे येथील बलस्थाने व कमकुवत दुवे यांची माहिती आहे. पूर्ण भर हा विद्यापीठाच्या विकासावरच असेल.
- पूरण मेश्राम, नवनियुक्त कुलसचिव
राजकारणाला महत्त्व नाही
विद्यापीठात अंतर्गत राजकारण असले तरी महत्त्वाच्या पदांच्या निवडीत उमेदवाराची क्षमता, अनुभव यांना महत्त्व देण्यात येते. सर्वांचे सादरीकरण झाल्यानंतर त्यातील उत्कृष्ट उमेदवारांची नावे काढण्यात आली व डॉ.पूरण मेश्राम यांचे नाव समोर आले. विद्यापीठात राजकारण नव्हे ‘मेरिट’ला महत्त्व आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Puran Meshram new registrar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.