गुंडाला संतप्त जमावाने बदडले
By Admin | Updated: March 4, 2017 02:01 IST2017-03-04T02:01:02+5:302017-03-04T02:01:02+5:30
एटीएममधून बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला चाकूने मारून जखमी केल्यानंतर त्याचे नऊ हजार रुपये लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाला संतप्त जमावाने पकडले

गुंडाला संतप्त जमावाने बदडले
चाकूने जखमी केले : नऊ हजार लुटले
नागपूर : एटीएममधून बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला चाकूने मारून जखमी केल्यानंतर त्याचे नऊ हजार रुपये लुटणाऱ्या एका कुख्यात गुंडाला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास सक्करदरा चौकात ही घटना घडली. गेंडा ऊर्फ सोनू राजकुमार दांडेकर (वय २०) असे आरोपीचे नाव आहे. तो भांडेप्लॉट झोपडपट्टीत राहतो.
शासकीय नोकरीत असलेले भारत महादेव सव्वालाखे (वय ४८, रा. सोमवारी पेठ) गुरुवारी रात्री ८ वाजता सक्करदरा चौकात आले. त्यांनी कॅनरा बँकेच्या एटीएममधून नऊ हजार रुपये काढले. ही रक्कम खिशात घालून ते पायी घराकडे निघाले. त्यांच्यावर नजर ठेवून असलेला कुख्यात गेंडा मागून आला आणि त्याने सव्वालाखेंना अडवले. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून नऊ हजार रुपये हिसकावण्याचा प्रयत्न केला. सव्वालाखेंनी विरोध केला असता आरोपीने त्यांच्या हनुवटीवर चाकू मारला. त्यामुळे सव्वालाखे ओरडले. तेवढ्या वेळेत आरोपी गेंडाने त्यांच्या खिशातून रक्कम हिसकावून घेतली.
दरम्यान, आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी गेंडाच्या मागे धावली अन् त्यांनी त्याला पकडून त्याची बेदम धुलाई केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सक्करदराचे पोलीस उपनिरीक्षक ओरके आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाच्या तावडीतून गेंडाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)
परिसरात दहशत
गेंडा हा खुनाचा आरोपी आहे. तो कारागृहातून बाहेर आल्यापासून परिसरात गुंडगिरी करतो. लुटमार, खंडणी वसुली, छेडखानी करून त्याने परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्याच्या दहशतीमुळे अनेक गुन्ह्याची तक्रारही पोलीस ठाण्यात होत नाही. त्यामुळे तो आता वर्दळीच्या भागातही लुटमारीसारखे गुन्हे करू लागला आहे.