उमरेड : तालुका आपत्ती व्यवस्थापन चमुने शहरातील डी मर्सी सेलीब्रेशन हॉल तसेच अनुप लॉनवर दंडात्मक कारवाई केली. दोन्ही ठिकाणी लग्न समारंभ कार्यक्रम सुरू होता. याठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केल्या गेली. दोन्ही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाड्यांची उपस्थिती होती. तपासणी दरम्यान नियमावलीचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने डी मर्सी हॉल आणि अनूप लॉनवर प्रत्येकी १७,५०० रुपये अशी एकूण ३५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शुक्रवारी तालुक्यात एकूण चार कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली. यामध्ये दोन शहरांतील, तर दोन रुग्ण ग्रामीणमधील आहेत.
काय साध्य होणार?
आठवड्यातून दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याच्या निर्णयावर सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, या निर्णयामुळे काय साध्य होणार असा सवाल जनमानसात विचारला जात आहे. बाजारपेठ बंद ठेवण्याऐवजी नियम कठोर करा आणि नियमावलीचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, असा सूर उमटत आहे. आठवड्यातून दोन दिवस बाजारपेठ बंदच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडत असून, अनेकांना यामुळे झळ पोहोचत आहे. दुसरीकडे केवळ दोन दिवसांच्या बंदनंतर सुद्धा कोरोनाबाधितांच्या आकडेवारी वाढतच आहे.