पुण्याच्या विवाहित प्रेमीयुगुलाची महागावात आत्महत्या
By Admin | Updated: October 16, 2014 00:53 IST2014-10-16T00:53:48+5:302014-10-16T00:53:48+5:30
एका विवाहित प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना महागाव येथील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी उघडकीस आली. दोघेही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असून ते एका

पुण्याच्या विवाहित प्रेमीयुगुलाची महागावात आत्महत्या
महागाव (यवतमाळ) : एका विवाहित प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना महागाव येथील स्मशानभूमीत बुधवारी सकाळी उघडकीस आली. दोघेही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील असून ते एका वाहनाने महागाव तालुक्यात आले होते.
जयश्री दीपक भोंगाडे (३१) रा. खुरपुडी ता. खेड आणि एकनाथ तुकाराम चौधरी (४२) रा. निमगाव ता. खेड अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दोघेही विवाहित असून जयश्रीला तीन मुले तर एकनाथला दोन अपत्ये आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दोघेही महागाव तालुक्यातील काळीटेंभी परिसरात एका वाहनाने संशयास्पदरित्या फिरत होते. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी महागाव पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्या दोघांना चौकशीसाठी बोलाविले. दोघेही विवाहित आणि सज्ञान असल्याने दोघांनाही सोडून दिले. तसेच दोघांच्या घरच्यांनाही माहिती दिली.
दरम्यान, मंगळवारी रात्री दोघांनीही महागाव येथील स्मशानभूमी गाठली. रात्री तेथे दोघांनीही विष प्राशन केले. बुधवारी सकाळी काही नागरिकांंना स्मशानभूमीत हे दोघे अत्यवस्थ आढळून आले. त्यापैकी एकनाथचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. तर अत्यवस्थ स्थितीत जयश्रीला सवना येथील रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ज्या वाहनाने हे दोघेही आले होते ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील त्यांचे नातेवाईकही महागावात पोहोचले. शवविच्छेदनानंतर दोन्ही प्रेते ताब्यात घेऊन ते पुण्याकडे रवाना झाले. विशेष म्हणजे दोघेही मोलमजुरी करणारे असून दिग्रस तालुक्यातील विठोली येथील मजुरांच्या ओळखीने या परिसरात आले होते. मात्र गावकऱ्यांनी पोलिसांना तसेच नातेवाईकांना माहिती दिल्याने आपली बदनामी होईल या भीतीतून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)