पुड्डूचेरीतील कैद्यांना १७० रुपये मजुरी मग महाराष्ट्रातील कैद्यांना ४० रुपये का ?
By Admin | Updated: June 4, 2015 02:42 IST2015-06-04T02:42:26+5:302015-06-04T02:42:26+5:30
पुड्डूचेरी येथील कुशल कैद्यांना कामाची मजुरी १७० रुपये मिळते मग महाराष्ट्र राज्यातील कैद्यांना ४० रुपये का,...

पुड्डूचेरीतील कैद्यांना १७० रुपये मजुरी मग महाराष्ट्रातील कैद्यांना ४० रुपये का ?
राहुल अवसरे नागपूर
पुड्डूचेरी येथील कुशल कैद्यांना कामाची मजुरी १७० रुपये मिळते मग महाराष्ट्र राज्यातील कैद्यांना ४० रुपये का, देशातील विविध राज्यातील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या मजुरींमध्ये मोठी तफावत आहे. ही मजुरी एकसमान का केली जात नाही, असे प्रश्न निर्माण केले जात आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या २०१३ च्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण ४३ कारागृहांमध्ये ८०४१ शिक्षा झालेले कैदी आहेत. केवळ शिक्षा होऊन कारावास भोगत असलेल्या कैद्यांनाच विविध कामात गुंतवून त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला ‘मजुरी’ दिली जाते. कामात कुशल असलेल्या कैद्याला ४० रुपये, अर्ध कुशलला ३५ रुपये आणि अकुशल कैद्याला २५ रुपये मजुरी दिली जाते. या कैद्यांना सुतारकाम, टेक्सटाईल, पॉवरलूम, टेलरिंग, लोहारकाम, बेकरी, कार वॉशिंग आणि लॉंड्रीची कामे दिली जातात.
प्रत्येक कैद्यांवर २१ हजाराचा खर्च
सध्या राज्याचा कारागृहांवरील खर्च १८६ कोटी २८ लाखांचा आहे. त्यापैकी आहारावर २७ कोटी ७ लाख, कपड्यांवर ३७ लाख ४० हजार , वैद्यकीय उपचारावर १ कोटी ३१ लाख ७० हजार आणि इतर खर्च २२ कोटी ६२ लाख ३० हजार रुपये आहे. प्रत्यक्ष कैद्यांवरचा एकूण खर्च ५१ कोटी ३८ लाख २० हजार रुपयाचा आहे. अर्थात प्रत्येक कैद्यावर वर्षाला २१ हजार रुपये खर्च होत आहेत.माहितीच्या अधिकारात प्राप्त केलेल्या माहितीमध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहाचा वार्षिक खर्च १० कोटी ३३ लाख ७० हजार ८१९ रुपये दाखवण्यात आलेला आहे. त्यापैकी वेतनावर ६ कोटी २ लाख ४७ हजार ४०७, मजुरीवर ४६ लाख ६५ हजार ९०५, अन्य भत्त्यांवर १५ लाख ४५ हजार ९३०, विजेचा खर्च ८३ लाख ६७ हजार ५४, प्रवासावर ५ लाख ८४ हजार ४५२, कार्यालयीन खर्च ३ लाख ७१ हजार, भाडेपट्टी ७७ हजार १७९, संगणक ५० हजार २५, आहाराचा खर्च २ कोटी १८ लाख १५ हजार २४४, इतर खर्च ५५ लाख ८५ हजार ९९४ रुपये एवढा आहे.