लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: अनुसुचित जाती-जमातींच्या नागरिकांसाठी एक दिलासादायक पाऊल उचलत, अनुसुचित जाती जमाती आयोगाच्या वतीने २२ जुलै २०२५ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभरात तक्रार निवारण जनसुनावणी परिषद राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची औपचारिक घोषणा आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शनिवारी रवीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
या परिषदेमध्ये वर्षभरात आलेल्या तक्रारींचे निवारण करण्यावर भर दिला जाणार आहे. जनसुनावणीसाठी नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे २२ जुलैपासून पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. यावेळी नागपूर जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, विविध योजनांचा आढावा आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातील चर्चा झाली.
"अनुसुचित जाती-जमातीच्या नागरिकांना न्याय मिळवून देणे ही आयोगाची प्राथमिकता आहे. या जनसुनावणी परिषदेमुळे त्यांचा विश्वास वाढेल आणि त्यांचे प्रश्न थेट शासनपातळीवर पोहोचतील," असे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे उपस्थित होते.