जनजागृती करणारेच झाले शिकार
By Admin | Updated: January 14, 2017 02:35 IST2017-01-14T02:35:28+5:302017-01-14T02:35:28+5:30
नायलॉन मांज्याच्या विरोधात जनजागृती मोहिमेवर असलेले सामाजिक कार्यकर्ते मांज्याच्या शिकार ठरले.

जनजागृती करणारेच झाले शिकार
दुपट्ट्यामुळे वाचला जीव : मांजामुळे विद्यार्थ्याचाही कापला अंगठा
नागपूर : नायलॉन मांज्याच्या विरोधात जनजागृती मोहिमेवर असलेले सामाजिक कार्यकर्ते मांज्याच्या शिकार ठरले. मानेला दुपट्टा गुंडाळल्यामुळे जीवघेणा अपघात टळला. जुनी शुक्रवारी परिसरातील पतंग बाजाराच्या अगदी समोर ही घटना घडली. तर दहीबाजार इतवारी पुलावर दुचाकीवर जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मांज्यामुळे अंगठा कापला.
अरविंद रतुडी आणि संजय पंचभाई हे आपल्या साथीदारांसह किंग कोबरा आॅर्गनायझेशनच्या माध्यमातून नायलॉन मांजाच्या विरुद्ध जनजागृती अभियान चालवितात. शुक्रवारी सकाळी रतुडी आणि पंचभाई यांनी नंदनवन आणि सक्करदरा परिसरातील शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी नायलॉन मांजाच्या विरोधात जनजागृती केली. त्यानंतर दोघेही दुपारी १.३० वाजता दुचाकीने सक्करदरा येथून जुनी शुक्रवारीकडे जात होते.
यादरम्यान दुचाकी चालवित असलेल्या संजय पंचभाई यांच्या गळ्याला नायलॉन मांजाने विळखा घातला. पंचभाई यांनी हेल्मेटसह मांजापासून बचावासाठी गळ्यात दुपट्टा घातला होता. मांज्याने दुपट्ट्याला काप घेत, काही समजण्याापूर्वीच त्यांचा गळा चिरला गेला. मागे बसलेल्या रतुडी यांनी मांजा तोडण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात दोघेही वाहनावरून खाली पडले. त्यांच्या मागूनच मिनिडोर येत होती. दोघेही खाली पडल्याने मिनिडोर चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे त्यांच्यामागे असलेली वाहने एकमेकांना धडकली. पंचभाई व रतुडी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. बाईकची गती अधिक नसल्याने आणि गळ्यात दुपट्टा असल्याने पंचभाई यांचा जीव वाचला.
दुसरी घटना दहीबाजार पुलावर घडली. नवीन बगडगंज, लकडगंज पोलीस स्टेशन जवळील अतुल देवीदास मूल हा विद्यार्थी आपल्या दुचाकीने स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी डॉ. राममनोहर लोहिया वाचनालयात पुलावरून जात होता. पुल उतरत असताना नायलॉन मांज्या त्याच्या मानेजवळ आला. मांज्या अडविण्याच्या प्रयत्नात अतुलचा अंगठा कापला गेला. त्याला लगेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून सर्जरी करण्यास सांगितले.(प्रतिनिधी)