पं. जयतिर्थ मेऊंडी आणि पं. भजन सोपोरी यांचे बहारदार सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:38+5:302021-07-31T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित ३० व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहास ...

पं. जयतिर्थ मेऊंडी आणि पं. भजन सोपोरी यांचे बहारदार सादरीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित ३० व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहास शुक्रवारपासून बहारदार सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पं. जयतिर्थ मेऊंडी यांचे शास्त्रीय गायन तर पद्मश्री पं. भजन सोपोरी यांचे संतूर वादन झाले.
तत्पूर्वी या ऑनलाईन महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा दमक्षेच्या परिसरात पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतज्ज्ञ व गुरु पं. नारायणराव मंगरुळकर आणि आकाशवाणीच्या माजी उद्घोषिका व नाट्यकलाकार प्रभा देऊस्कर यांचा सत्कार करण्यात आला.
महोत्सवातील पहिल्या दिवसाची सुरुवात पं. जयतिर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग यमन कल्याण मधील ‘दे पिया बिन रतिया’ या बंदिशीने सुरुवात केली. त्यानंतर तराना, राम मिया मल्हार मध्ये ‘धूम धूम’ व नाट्यगीत ‘या भवनातील गीत पुराणे’ अशा मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण त्यांनी केले. ‘छंद मजला विठ्ठलाचा’ या मराठी अभंगाने त्यांनी समापन केले. तबल्यावर पांडुरंग पवार व संवादिनीवर अभिषेक शंकर यांनी संगत केली. तद्नंतर पद्मश्री पं. भजन सोपोरी यांचे संतूर वादन झाले. राग कांसी कानडा मध्ये आलाप, जोड झाला नंतर रुद्रताल व तिनतालमध्ये गत सादर केले. ‘कश्मिरिका अंग’ने त्यांनी समापन केले. त्यांना तबल्यावर दुर्जय भौमिक, पखावजवर ऋषी शंकर उपाध्याय व घटमवर वरूण राजशेखरन यांनी संगत केली.
-------------
आज महोत्सवात
शनिवारी ३१ जुलै रोजी महोत्सवात अनिरुद्ध देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, डॉ. पल्लवी किशन यांचे कथ्थक डान्स बॅले आणि पं. प्रवीण गोडखिंडी व शादज गोडखिंडी यांच्या बांसरी जुगलबंदीचे सादरीकरण संध्याकाळी ६ वाजतापासून होईल.
............