बलात्काराच्या आरोपात पीएसआयला अटक
By Admin | Updated: December 22, 2016 02:39 IST2016-12-22T02:39:15+5:302016-12-22T02:39:15+5:30
शहर पोलीस विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) ला एका विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

बलात्काराच्या आरोपात पीएसआयला अटक
विवाहितेची तक्रार : गुन्हा दाखल
नागपूर : शहर पोलीस विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) ला एका विवाहितेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गोवर्धन दशरथ तायडे (५४) असे आरोपी पीएसआयचे नाव आहे. तायडे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. तेथून त्यांना उच्च न्यायालयाच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाते. पीडित ४७ वर्षीय महिला अजनी पोलीस ठाणे परिसरात राहते. तिचे पती अर्जनवीस आहेत.
तायडे याचा मित्र पीडितेच्या शेजारी राहतो. मित्राच्या घरी येणे जाणे असल्याने तायडेची पीडिता व त्यांच्या पतीशी ओळख झाली. तायडे पीडित महिलेच्या घरी ये-जा करू लागला. दोघांमध्ये कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले. ते यात्रेलाही बाहेर जाऊन आले. सोमवारी पीडितेने तायडेच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार तायडेने जूनमध्ये तिच्याशी ओळख वाढवून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो तिच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. तायडे पोलीस असल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत महिलेने दाखविली नाही. परंतु सातत्याने हा प्रकार होत असल्याने पीडितेने अखेर तक्रार दाखल केली. प्रकरण संवेदनशील असल्याने अजनी पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली. तायडेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.(प्रतिनिधी)