लोकमत न्यूज नेटवर्कधामना : काटोल तालुक्यातील कोतवालबर्डी येथील एशियन फायर वर्क्स या कंपनीमध्ये रविवारी स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर चार कामगार जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना कंपनीतर्फे २० लाख, तर जखमींना ५ लाख रुपयांची मदत देण्याचे निर्देश कंपनी व्यवस्थापनाला महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
बावनकुळे यांनी सोमवारी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमानुसार पीएफ उपलब्ध करून द्या, असेही निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी पीयूष चिवंडे, पोलिस अधिकारी नरेश म्हस्के, उज्वल लोया, राजू रणवीर उपस्थित होते.
स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची तपासणी होणारजिल्ह्यातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपन्या सुरक्षिततेचे पालन करीत आहे की नाहीत, याची काटेकोरपणे तपासणी करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील सर्वच स्फोटके निर्मिती करणाऱ्या २३ कंपन्यांच्या सुरक्षिततेची संबंधित यंत्रणेने काटेकोरपणे तपासणी केली पाहिजे.
तपासणी मोहीमस्फोटक निर्मिती कंपन्या सदैव आव्हानात्मक परिस्थिती स्वीकारून तत्पर असायला हव्यात. त्यामुळे अशा अस्थापनांनी सुरक्षेची अतिशय काळजी घेण्याची गरज असते. वारंवार अशा घटना घडत असतील व यात जीवित हानी होत असेल तर संवेदनशील शासन म्हणून अशा घटना पुढे होऊ नयेत, यासाठी तपासणीसाठी विशेष मोहीम घ्या, असे ते म्हणाले.