विरोध नडला, मोर्चा अडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2015 03:02 IST2015-12-17T03:02:50+5:302015-12-17T03:02:50+5:30

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बुधवारी सकाळी केलेल्या लाठीहल्ल्यात १०० जण जखमी झाले.

Protested | विरोध नडला, मोर्चा अडला

विरोध नडला, मोर्चा अडला

१०० जखमींवर मेयोत उपचार : संगणक परिचालक मोर्चाला हिंसक वळण, मागण्यांवर ठाम
नागपूर : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या मोर्चातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी बुधवारी सकाळी केलेल्या लाठीहल्ल्यात १०० जण जखमी झाले. या सर्वांवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार करण्यात आले. यात १८ जखमींना विविध वॉर्डात भरती केले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भरती असलेल्या जखमींमध्ये चार युवतींचा समावेश आहे.
राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने मंगळवारी विधानभवनावर काढण्यात आलेल्या मोर्चेकरांनी दुसऱ्या दिवशी, बुधवारी आपल्या मागण्या रेटून धरल्या. सकाळी अचानक मोर्चेकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात काही पोलिसांसह १०० कार्यकर्ते जखमी झाले. जखमींना तत्काळ मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. सकाळी ९ वाजता अपघात विभागात २० कार्यकर्त्यांना जखमी अवस्थेत आणण्यात आले. याची खबर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन खामगावकर यांना मिळताच ते डॉक्टरांच्या चमूसह विभागात पोहचले. त्यावेळी ड्युटीवर असलेले कॅज्युल्टी मेडिकल आॅफिसर (सीएमओ) डॉ. श्रुती कुकडे आणि डॉ. मंगेश भगत यांना विशेष सूचना देत रुग्णांवर उपचार सुरू केले. दुपारी १२.३० वाजेपर्यंत १०० जखमींवर उपचार करण्यात आले. यातील जखमी प्रकाश रणोत (३०) बुलडाणा, शिवाजी भुतेकर (२५) जालना, शितल पगारे (२४), जालना यांना अस्थिव्यंग विभागाच्या वॉर्डात, ईश्वर चव्हाण (२२) औरंगाबाद याला नेत्ररोग विभाागच्या वॉर्डात, जयश्री शेंडे (२५) भंडारा, संगीता लाडे (२४) नाशीक, चारुशीला पाटील (२५) नाशिक, हेमराज शेंडे (२५) भंडारा, अब्दूल रहिमखान (२०) औरंगाबाद, मनोहर राजूरकर (२९) चंद्रपूर, जाहनकरीम वामनराव (२६) बीड, मारुती चव्हाण (३५) नाशिक, विठ्ठल खरात (२७) बुलडाणा, जयदेव सरकार (२८) गोंदिया, दीपक वाघ (२९) जळगाव, मारुती सावंत (३०) जालना, गणेश घुले (२७) नाशिक व बाबासाहेब गायकवाड (३०) जालना यांच्यावर शल्यचिकित्सक विभागाच्या वॉर्डात पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले. यातील मनोहर राजूरकर, विठ्ठल खरात, आणि बाबासाहेब गायकवाड हे गंभीर जखमी आहेत. तिन्ही रुग्णांना डोके आणि छातीवर लाठ्यांचा मार बसल्याने शरीराच्या आत जखम झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सायंकाळी दोन जखमींना सुटी देण्यात आली.

लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा-धनंजय मुंडे
संगणक परिचालकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद विधान परिषदेत उमटले. परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात आक्रमक पवित्रा घेतला व लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. त्यांनी या मुद्यावर नियम २८९ अंतर्गत चर्चा करण्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडला. परंतु सभापतींनी तो फेटाळून लावला. ‘संग्राम’ प्रकल्पामध्ये काम करणारे राज्यातील संगणक परिचालक आपल्या मागण्यांसाठी नागपूर अधिवेशनावर मोर्चा घेऊन आले असताना त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याऐवजी या परिचालकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी शासन पोलीसबळाचा वापर करून जनतेचा आवाज दाबण्याचे काम करीत आहे. आंदोलनकर्त्यांवर अमानुष हल्ला करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे, तसेच या संगणक परिचालकांबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी परिचालकांच्या शिष्टमंडळाचे मंगळवारीच समाधान केले असल्याची स्पष्टोक्ती केली. १४ व्या वित्त आयोगात ‘संग्राम’साठी तरतूद नसल्याने यापुढे याचे काय होईल हे आताच सांगता येत नाही, असे त्यांनी सांगितले. यावर अखेर सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी प्रस्ताव फेटाळल्याचा निर्णय सांगितला.

तोपर्यंत हटणार नाही

हा राज्यभरातील २७ हजार संगणक परिचालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांनी आमच्यावर कितीही लाठीचार्ज केला, तरी सरकार आम्हाला जोपर्यंत न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना बोलून दाखविला. ते म्हणाले, मंगळवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. परंतु त्यातून काहीही फलित निघाले नाही. सरकार मागील एक वर्षांपासून केवळ आश्वासनेच देत आहे. त्यामुळे आम्ही मंगळवारी संपूर्ण रात्र रस्त्यावर काढली. सरकार जोपर्यंत ठोस निर्णय देत नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही. असे ते म्हणाले.
मोर्चेकऱ्यांचा जोश कायम
पोलिसांच्या लाठीचार्चमध्ये शेकडो मोर्चेकरी जखमी झाले. यात कुणाचा हात मोडला तर कुणाच्या पायाला गंभीर जखम झाली. परंतु असे असताना अनेक मोर्चेकरी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर लगेच पुन्हा मोर्चात सहभागी झाले होेते. त्यांच्या हाता-पायावर बँडेज होते. शिवाय संघटनेचा अध्यक्ष सिद्घेश्वर मुंडे यांच्यासह अनेकांच्या शरीरावर पोलिसांच्या लाठ्यांचे वळ उमटले होते. मात्र असे असताना सर्व मोर्चेकऱ्यांमधील जोश कायम होता. सर्व मोर्चेकऱ्यांनी दिवसभर रस्त्यावर बसून पोलिसांच्या लाठीचार्चचा निषेध केला. रात्री उशिरापर्यंतसुद्धा सर्व मोर्चेकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले होते.

Web Title: Protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.