जवखेडे हत्याकांडाचा निषेध
By Admin | Updated: November 4, 2014 01:03 IST2014-11-04T01:03:10+5:302014-11-04T01:03:10+5:30
जवखेडे (पाथर्डी) येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

जवखेडे हत्याकांडाचा निषेध
काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आरोपीला अटक करण्याची मागणी
नागपूर : जवखेडे (पाथर्डी) येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेसतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यात आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आली.
गेल्या २० आॅक्टोबर रोजी जि. अहमदनगर ता. पाथर्डी येथील जवखेडे या गावातील १९ वर्षांचा हुशार मुलगा सुनील जाधव, त्याचे वडील संजय जाधव व आई जयश्री जाधव यांची झोपेत अमानुषपणे हत्या करण्यात आली. जातीय मानसिकतेतून करण्यात आलेल्या या हत्याकांडामुळे एकूणच समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या हत्याकांडातील आरोपीला तातडीने अटक न झाल्याने हा असंतोष उफाळून येत आहे. सोमवारी काँग्रेसतर्फे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांना मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या हत्याकांड प्रकरणी काँग्रेस अतिशय गंभीर असून आंदोलनाचा पहिला भाग म्हणून निवेदन सादर करण्यात आले आहे. आरोपीला तातडीने अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिला. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय ते संविधान चौक दरम्यान कॅण्डल मार्च काढण्यात आला. संविधान चौकात पोहोचल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. आंदोलनात यशवंत कुंभलकर, अभिजित वंजारी, नितीश ग्वालबंशी, जयंत लुटे, संदीप सहारे, कुणाल राऊत, दीपक कापसे, ईश्वर बर्डे, अरुण डवरे, सिंधू उईके, बंडोपंत टेंभुर्णे, प्रशांत धवड, भावना लोणारे, ममता गेडाम आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)