रक्षकच बनले हल्लेखोर!
By Admin | Updated: November 4, 2015 03:10 IST2015-11-04T03:10:44+5:302015-11-04T03:10:44+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्ण, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात

रक्षकच बनले हल्लेखोर!
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रुग्ण, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले, परंतु हे रक्षकच डॉक्टर आणि रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे. विशेषत: प्रसूती वॉर्ड, अतिदक्षता कक्ष व मुख्य प्रवेशद्वाराच्या रक्षकांकडून मदतीची अपेक्षा असताना रुग्णांना टाकून बोलणे, धमकाविणे, पैशाची मागणी करणे आदी प्रकार सर्रास सुरू आहेत. याच्या तक्रारीही झाल्या असून कारवाई नसल्याने सोमवारी डॉक्टरला रक्षकाकडून मारहाणीची घटना घडल्याचे बोलले जात आहे.
रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी पूर्वी मेस्को कंपनीचे सुरक्षा रक्षक होते. परंतु वेतनाला घेऊन वाद निर्माण झाल्याने या कंपनीचे कामबंद झाले. त्या जागेवर मेयो रुग्णालयात कार्यरत असलेल्या ‘युनिटी कंपनी’कडे जबाबदारी देण्यात आली. परंतु या कंपनीच्या रक्षकांच्या कामावरील तक्रारी वाढल्या आहेत.
सूत्राच्या मते, काही सुरक्षा रक्षक दारू पिऊन येत असल्याने त्यांना सेवेतूनही काढण्यात आले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे की, वॉर्डात तैनात सुरक्षा रक्षकांकडून अपेक्षित वागणूक मिळत नाही. रुग्णाशी भेट घेऊ देत नाही. वाटेल ते बोलतात. अनेक वेळा पैशांची मागणी करतात. खर्रा, तंबाखू तपासणीच्या नावाखाली खिशात हात घालतात. रुग्णाला चांगले उपचार मिळावे या एकमेव उद्देशाने अनेक जण त्यांच्या विरोधात जात नाही. तक्रार करीत नाही. संबंधित वॉर्डातील डॉक्टर, परिचारिकांना याची जाणीव आहे, परंतु त्यांच्याकडूनही मदत मिळत नाही.(प्रतिनिधी)
रुग्ण पळविणाऱ्या टोळीला संरक्षण
मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला खासगी इस्पितळात पळवून नेणारी दलालांची टोळी सक्रिय आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असतो. विशेषत: रात्रीच्या वेळी दलाल आणि रक्षकांत गप्पांची मैफील रंगते. रक्षकांच्या खोलीतही हे दलाल वावरत असल्याची माहिती आहे.
महिला सुरक्षा रक्षकाने मारली थापड
सूत्राने सांगितले, २६ आॅक्टोबर सायंकाळच्यावेळी प्रसूती वॉर्डात तैनात असलेल्या एका महिला सुरक्षा रक्षकाने रुग्णाच्या पतीला जोरदार थापड मारली. त्यानंतर पुरुष रक्षकांना बोलवून घेराबंदी करून रक्षकाच्या खोलीत त्यांना घेऊन गेले. त्या पीडिताने ओळखीच्या एका डॉक्टराला फोन लावून मदत मागितल्यावर त्याची सुटका झाली. सुरक्षेच्या दृष्टीने त्याने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चौकशी समिती स्थापन
सोमवारी डॉक्टरला झालेल्या मारहाणीतील सुरक्षा रक्षक हा मेडिकलचा नाही. तो ‘नॅको’चा आहे. या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय चमू दोन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. याशिवाय कुठल्याही सुरक्षा रक्षकाच्या संदर्भात तक्रार प्राप्त झालेली नाही.
-डॉ. अभिमन्यू निसवाडे
अधिष्ठाता, मेडिकल