महिलांनी उभारले सुरक्षा कवच
By Admin | Updated: May 29, 2015 02:23 IST2015-05-29T02:23:29+5:302015-05-29T02:23:29+5:30
शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सरस्वती विहार, त्रिमूर्तिनगर येथील महिलांनी सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन परिसरात सीसीटीव्ही लावले.

महिलांनी उभारले सुरक्षा कवच
नागपूर : शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सरस्वती विहार, त्रिमूर्तिनगर येथील महिलांनी सुरक्षेसाठी पुढाकार घेऊन परिसरात सीसीटीव्ही लावले. यासाठी महिलांनी वर्गणी गोळा केली. सरकारच्या मदतीशिवाय महिलांनी सुरक्षेबाबत दाखविलेली जागरूकता बघून परिसरात सरस्वती विहारच्या महिलांचे कौतुक होत आहे. सरस्वती विहार कॉलनीतील सीसीटीव्हीचे उद्घाटन प्रतापनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार संजय खटारे यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेविका प्रेरणा कापसे उपस्थित होत्या. खटारे यांनी महिलांच्या उपक्रमाचे कौतुक केले. महिलांना सुरक्षेचे महत्त्व पटवून देऊन त्यादृष्टीने मार्गदर्शन केले, शिवाय सुरक्षेच्या काही टिप्सही दिल्या. परिसरातील दारूच्या दुकानामुळे या भागात पसरलेली अस्वच्छता दूर करण्यासाठी परिसरातील महिलांनी पुढाकार घेतला आणि सरस्वती विहार महिला मंडळाची स्थापना केली. मंडळाने परिसराची सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी काम करण्याचा निश्चय केला असल्याचे मंडळाच्या अध्यक्ष चंद्रा पराते यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा खापरे यांनी तर आभार ममता फुके यांनी मानले.(प्रतिनिधी)