काटोल : निसर्गातील बदलामुळे संत्रा व मोसंबी पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होता. तो वेळीच आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. दुष्काळी परिस्थितीने शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान विभिन्न प्रयोगांच्या आणि अनुभवाच्या माध्यमातून संत्री-मोसंबीच्या बागा वाचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश ठाकरे यांनी केले. संत्री मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेड व कृषी मित्र प्रतिष्ठान, काटोलतर्फे कृषी मित्र फार्म, धरतवाडा येथे संत्री-मोसंबी आंबिया बहार तसेच कीड व रोगनियंत्रण यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. आयपीएल बायोलॉजिकल लिमिटेडच्या वतीने याप्रसंगी शेतकऱ्यांना सध्या भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. डिंक्या, मर, मुळकुज, फळगळ आणि गतवर्षी झालेल्या अती पावसामुळे खराब झालेले झाड हे योग्यवेळी औषधाच्या वापराने सुरक्षित ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण राहुल जतकर, सचिन खरबडे यांनी केले. चर्चासत्रानंतर प्रगतशील शेतकरी हेमंत जिचकार, जयसिंग शिंदे, प्रकाश नागमोते, जोगेश सावल, शेषराव वानखेडे, प्रभाकर वाघ, भाऊराव ठाकरे, दीपक पटेल, दीपक मोहिते यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे सदस्य समीर उमप यांच्या हस्ते करण्यात आला. राजेश ठाकरे यांनी प्रास्ताविक केले, तर सुनील शेटे यांनी आभार मानले.
नवतंत्रज्ञानाचा आधार घेत फळबागेचे संरक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST