नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 12:05 PM2022-11-16T12:05:05+5:302022-11-16T12:06:01+5:30

याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देश

Proposal to expand Nagpur Legislature Precinct; Reviewed by Vidhan Sabha Speaker and Dy Speaker of Legislative Council | नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

googlenewsNext

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपुरातील विधिमंडळ परिसरात बरीच गर्दी होते. जागा अपुरी पडते. अनेक कक्ष नव्याने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे या परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. विधिमंडळ काळात विविध बैठका घेण्यासाठी मुंबईप्रमाणे येथे सेंट्रल हॉलची गरज आहे. त्यासाठी सोयीस्कर जागा अधिग्रहित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसंदर्भात मंगळवारी नागपूर विधिमंडळ परिसरात मंत्रिपरिषद सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला. या बैठकीला विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, विधिमंडळ अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा व विधान परिषदेच्या वृत्तांकनासंदर्भात मोठ्या प्रमाणात माध्यम प्रतिनिधींची संख्या वाढली आहे. माध्यमांचे स्वरूपही बदलले आहेत. त्या तुलनेत सभागृहामध्ये बैठक व्यवस्था अपुरी आहे, हे लक्षात घेऊन सभागृहाबाहेर सभागृहातील सर्व व्यवस्था असणारा शामियाना उभारण्याबाबतची सूचना अध्यक्षांनी यावेळी केली. पत्रकारांच्या वाढत्या संख्येला या आधुनिक सुविधांनी युक्त अशा शामियानामध्ये आतील कामकाजाचे वृत्तांकन करता येईल,असे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. लवकरच मुंबई येथे कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल व त्यामध्ये अधिवेशनाच्या संदर्भातील कालावधी व अन्य महत्त्वपूर्ण घोषणा होतील असेही त्यांनी यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आतमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेली गर्दी, प्रत्येक मंत्री व आमदारांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रवेशिका, विधान भवन परिसरातील महिला सुरक्षा कर्मचारी यांच्यासाठीची आवश्यक प्रसाधन व्यवस्था, महिला आमदार यांची आमदार निवासातील व्यवस्था, अधिवेशनासाठी विदर्भाच्या दुर्गम भागातून येणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसाठीच्या बसेसची व्यवस्था, या काळात खासगी बस भाड्यामध्ये वाढ होऊ न देणे, तसेच यावर परिवहन विभागाने नियंत्रण ठेवण्याची सूचना केली.

१० हजार पोलिस तैनात राहणार

  • नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील माहिती दिली.
  • अधिवेशनासाठी दहा हजारांवर पोलिस वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असतील.
  • नागपुरातील विधिमंडळाचा संपूर्ण परिसर तसेच लोकप्रतिनिधींच्या वास्तव्याची सर्व ठिकाणे सीसीटीव्हीच्या निगराणीत असतील.
  • महिला आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात कडेकोट बंदोबस्त आमदार निवासात ठेवण्यात येईल.

प्रवेशासाठी ‘बारकोड’चा वापर

- अधिवेशन काळात मर्यादित प्रवेश व सुरक्षा व्यवस्थेला लक्षात घेऊन संसदेप्रमाणे मध्यवर्ती 'बारकोड ' पद्धतीचा अवलंब करावा. प्रवेशिका स्कॅन करून प्रवेश व्हावा, अशी सूचना नार्वेकर यांनी केली.

आव्हाडांचा राजीनामा पोहोचला नाही

- राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे नाराजीतून आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. याबाबत विचारणा केली असता आव्हांडाचा राजीनामा अद्याप विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे आलेला नाही, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या आमदारांबाबत विचारले असता ते म्हणाले,

लोकप्रतिनिधींना सभागृहात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोक पाठवतात. जे प्रश्न मांडत नाही त्यांना पुन्हा पाठवायचे की नाही हे जनताच ठरवेल. सर्व पक्षांशी चर्चा करून विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Proposal to expand Nagpur Legislature Precinct; Reviewed by Vidhan Sabha Speaker and Dy Speaker of Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.