डीसीपी साहू यांच्या पथकाचा छापा :
२२ तरुण आणि तरुणी ताब्यात : आतापर्यंतची शहरातील सर्वात मोठी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाकडून बंदी असूनही बिनबोभाट चालविल्या जाणाऱ्या शहरातील दोन हुक्का पार्लरवर पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी रात्री छापे घातले. यात एका ठिकाणी १९ लाखांचा तर दुसऱ्या ठिकाणी १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या छाप्यात २२ तरुण-तरुणींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपुरातील आतापर्यंतची हुक्क्यावरील ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली आहे. असे असताना, अंबाझरीत हवेली कॅफे तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्यूजन हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांना शुक्रवारी रात्री मिळाली होती. त्यांनी आपल्या विशेष पथकाला एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे घालण्याचे आदेश देऊन कारवाई करून घेतली. अंबाझरीतील भरतनगरमध्ये सुरू असलेल्या हवेली कॅफे नामक हुक्का पार्लरमध्ये कॅफे मालक प्रेम जोरणकर आणि संचालक प्रीतम यादव आपल्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून ग्राहकांना हुक्का देत होते. येथे जोरणकर, यादव आणि त्यांचे दोन कर्मचारी तसेच सात तरुण तरुणी अशा ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथून रोख रक्कम, हुक्का फ्लेवर, पॉट आणि अन्य साहित्य असा एकूण एक लाख, १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फ्यूजन कॅफे पार्लरमध्ये ११ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले. मयंक गौरीशंकर अग्रवाल हा हे हुक्का पार्लर चालवित होता. तेथून पोलिसांनी १८ लाख, ९६ हजारांचे साहित्य जप्त केले. या दोन्ही ठिकाणच्या आरोपींविरुद्ध अनुक्रमे अंबाझरी तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्यात कोपटा कायदा, साथ रोग नियंत्रण कायद्यानुसार वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
---
बावाजी, बॅरलशी कनेक्शन
या हुक्का पार्लरचे कनेक्शन कुख्यात जुगारी बावाजी आणि बॅरलशी असल्याचे समजते. त्याचमुळे शहराच्या मध्यभागी हुक्क्याचा धूर उडविला जात होता.
---