प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला

By Admin | Updated: December 26, 2016 02:28 IST2016-12-26T02:28:49+5:302016-12-26T02:28:49+5:30

कोट्यवधीच्या मालमत्तेच्या सौद्यातून वाद निर्माण झाल्यानंतर एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर चौघांनी हल्ला केला.

Property dealer house attack | प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला

प्रॉपर्टी डीलरच्या घरावर हल्ला

तोडफोड, मारहाण : २० लाखांची खंडणी मागितली
नागपूर : कोट्यवधीच्या मालमत्तेच्या सौद्यातून वाद निर्माण झाल्यानंतर एका प्रॉपर्टी डीलरच्या घरावर चौघांनी हल्ला केला. त्याला मारहाण करून आरोपींनी त्याच्या वाहनाची तोडफोड केली आणि २० लाखांची खंडणी मागितली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे २.४५ ते ३ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
विकेश कैलास जोशी (वय २७) असे तक्रारकर्त्या प्रॉपर्टी डीलरचे नाव आहे. ते रामनगरजवळच्या मरारटोलीत राहतात. इतवारीत त्यांचे कार्यालय आहे. या भागातील एका कोट्यवधीच्या मालमत्तेचा सौदा करण्यात जोशी यांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले जाते. त्या वादग्रस्त मालमत्तेच्या सौद्याशी आरोपीही जुळले आहेत. आर्थिक व्यवहाराच्या हालचाली वाढल्याचे कळाल्याने आरोपी आशिष पारधी, हिमांशू पारधी आणि त्यांच्या साथीदारांचा जोशीसोबत वाद सुरू झाला. या पार्श्वभूमीवर रविवारी पहाटे २.४५ च्या सुमारास आशिष, हिमांशू आणि त्यांचे दोन साथीदार जोशीच्या घरावर चालून आले. घरातील साहित्य तसेच वाहनाची तोडफोड करीत जोशी यांना हातबुक्कीने मारहाण केली. ‘त्या’ मालमत्तेत हस्तक्षेप करायचा नाही, असा धाक दाखवून आरोपींनी जोशीला धमकी दिली आणि २० लाखांची खंडणी मागितली. जोशी यांनी रविवारी सकाळी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)

Web Title: Property dealer house attack