एलईडीच्या विरोधात अपप्रचार

By Admin | Updated: March 23, 2015 02:13 IST2015-03-23T02:13:53+5:302015-03-23T02:13:53+5:30

एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे,

Propaganda against LED | एलईडीच्या विरोधात अपप्रचार

एलईडीच्या विरोधात अपप्रचार

नागपूर : एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे, असे सांगतानाच काही लोकं या विरोधात अपप्रचार करीत आहे, अशी टीका केंद्रीय ऊर्जा व कोळसा खाण राज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.
वेस्टर्न कोलफिल्ड लि.च्या कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईत एलईडी दिवे लावण्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोध केला होता व दिवे खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोपही केला होता. यासंदर्भात गोयल यांना विचारले असता त्यांनी राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. काही लोक या विरोधात अपप्रचार करीत आहेत. कदाचित त्यांची रुची ही खासगी क्षेत्रात असावी, असे गोयल म्हणाले.
केंद्रीय योजनेनुसारच जुने पथदिवे बदलून त्याजागी एलईडी लावण्याचा निर्णय झाला. या दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होते. त्यामुळे पुढील तीन वर्षात शासकीय कार्यालये आणि घराघरातसुद्धा एलईडी लावण्यास मान्यता दिली आहे. यामुळे १० हजार मे.वॅ.विजेची मागणी कमी होईल व देशात १२ ते १५ हजार कोटींची बचत होईल. एकट्या मुंबईत ८० कोटी रुपये यामुळे वाचतील व त्यासाठी महापालिकेला काहीही खर्च येणार नाही. मागणी वाढल्याने एलईडीच्या किंमतीही कमी होत असून खरेदीची प्रक्रियाही पारदर्शकतेनेच पूर्ण केली जात आहे, याकडेही गोयल यांनी लक्ष वेधले. रद्द झालेल्या कोळसा खाण पट्टे वाटपाच्या संदर्भात न्यायालयाने संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे आदेश दिले आहे. दंड न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुधारित पद्धतीने झालेल्या कोळसा खाणपट्याच्या लिलावातून सरकारला महसूल अधिक मिळणार असला तरी त्यामुळे विजेचे दर वाढणार नाही. कारण लिलाव करतानाच यासंदर्भात अट घालण्यात आली आहे, असे गोयल म्हणाले. कोळशाच्या दर्जावरून राज्यात वेकोलि आणि महाजन्को यांच्यातील सर्व वाद संपुष्टात आले असून आता नवीन सुरुवात झाली आहे. यापूर्वीच्या सरकारने याकडे लक्षच दिले नव्हते, असे गोयल म्हणाले.(प्रतिनिधी)

Web Title: Propaganda against LED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.