कारागृहात वरिष्ठांची प्रदीर्घ चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 03:04 IST2015-07-25T03:04:09+5:302015-07-25T03:04:09+5:30

कारागृह उपमहानिरीक्षकाचे (डीआयजी) पद रिक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे शुक्रवारी नागपुरात आले.

Prolonged discussions of senior prisoners in jail | कारागृहात वरिष्ठांची प्रदीर्घ चर्चा

कारागृहात वरिष्ठांची प्रदीर्घ चर्चा

मिशन याकूब : डीआयजी आणि एसपीची व्यूहरचना
नागपूर : कारागृह उपमहानिरीक्षकाचे (डीआयजी) पद रिक्त असल्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे शुक्रवारी नागपुरात आले. अधीक्षक योगेश देसाई यांच्यासोबत त्यांनी दिवसभर कारागृहातील परिस्थितीचे अवलोकन करून प्रदीर्घ बैठक केली. याकूब मेमनच्या फाशीच्या तयारीची ही बैठक होती, असे समजते. कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर शनिवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहाला भेट देणार आहेत.
‘जेल ब्रेक‘ नंतर कारागृहातील वातावरण ढवळून निघाले होते. पाच अधिकारी आणि सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह दोन डझन अधिकारी-कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर येथे उपमहानिरीक्षक म्हणून स्वाती साठे तर योगेश देसाई यांच्याकडे अधीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. हे अधिकारी कारागृहातील वातावरण सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत असतानाच येथे बंदिस्त असलेला याकूब अब्दुल रज्जाक मेमन याचा डेथ वॉरंट निघाला.
त्यामुळे नागपूरचे मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा देश-विदेशात चर्चेत आले. याकूबला फाशी देण्याची तयारी सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी स्वाती साठे यांनी आपला प्रभार सोडून ती सूत्रे अधीक्षक योगेश देसाई यांना सोपविली. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले. लोकमतने या संबंधाचे वृत्त आज ठळकपणे प्रकाशित केले. या पार्श्वभूमीवर, उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे (उपमहानिरीक्षक) शुक्रवारी येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल झाले.
स्वाती साठे यांनी सोडलेला नागपूर कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा प्रभार त्यांना सोपविण्यात येणार असल्याची चर्चा असतानाच रात्री दुसरेच वृत्त आले. धामणे यांना पदभार स्वीकारण्यासाठी नव्हे तर अधीक्षक देसाई यांना मदत करण्यासाठी येथे पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
त्याचमुळे धामणे यांनी देसाई यांच्यासोबत आज दिवसभर कारागृहाचे निरीक्षण करून स्थिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली, मात्र ते डीआयजींचा प्रभार स्वीकारण्यासाठी आले नव्हते, असे देसाई यांनी रात्री लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, महानिरीक्षक बोरवणकर शुक्रवारी रात्री नागपुरात आल्या. वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शनिवारी सकाळी त्या कारागृहास भेट देणार आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Prolonged discussions of senior prisoners in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.