विदर्भाच्या मुद्यावर भरभराट आणि नेत्यांमुळे घसरण
By Admin | Updated: September 6, 2014 03:03 IST2014-09-06T03:03:17+5:302014-09-06T03:03:17+5:30
कधी काळी नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसच्या विरोधात प्रबळ राजकीय शक्ती म्हणून पुढे आलेला, खासदार आणि आमदार निवडून ...

विदर्भाच्या मुद्यावर भरभराट आणि नेत्यांमुळे घसरण
नागपूर: कधी काळी नागपूर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसच्या विरोधात प्रबळ राजकीय शक्ती म्हणून पुढे आलेला, खासदार आणि आमदार निवडून आणणारा आणि स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्यावर जनमत पेटवणारा आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष काळाच्या ओघात नागपूर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरून अस्तास पावला आहे.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर काही पक्ष आणि संघटना निवडणुका लढविण्याच्या घोषणा करीत असतानाच्या पार्श्वभूमीवर फॉरवर्ड ब्लॉकसारख्या लढाऊ बाण्याच्या पक्षाची आठवण होते. राजकारणात सर्वच दिवस सारखे नसतात. मग तो नेता असो किंवा राजकीय पक्ष. भरभराटीच्या काळात पक्षासोबत जुळणाऱ्यांची संख्या जशी वाढते तशीच पक्षाचा ऱ्हास व्हायला लागला की कार्यकर्ते सोडून जातात. अशावेळी पक्ष नेतृत्वाची कसोटी असते. नेतृत्व कसोटीला उतरले की पक्ष पुन्हा उभा राहतो अन्यथा त्याची अवस्था दयनीय होते. आॅल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकच्या बाबतीत हेच झाले.
डाव्या विचारसरणीचा हा पक्ष नागपूर व विदर्भाच्या जमिनीत रुजला आणि बहरला तो स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर. या पक्षाच्या नेत्यांनी पेटविलेल्या जनमतावरून. १९६० ते १९७० चे दशक या पक्षासाठी भरभराटीचे होते. संघर्षशील कार्यकर्ते पक्षासोबत होते. १९६२ आणि १९६७ च्या निवडणुकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार उभा नसला तरी पक्षाची विचारसरणी असलेले कार्यकर्ते रिंगणात उतरले होते. १९७१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते जाबुंवतराव धोटे विजयी झाले. १९७२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने उत्तर नागपूरची (राखीव) जागा जिंकली. पूर्व नागपूर, रामटेक, सावनेर आणि कळमेश्वर या चार मतदारसंघात पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. यावरून या पक्षाची त्या काळातील राजकीय शक्ती लक्षात येते. त्यानंतर १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कळमेश्वर मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार भगवंतराव गायकवाड प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले होते.
पण नंतर राजकीय समीकरणे बदलत गेली. पक्षाचे नेते जांबुवंतराव धोटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत फॉरवर्ड ब्लॉकचे अनेक नेतेही गेले. १९८० च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने धोटे यांना नागपुरातून उमेदवारी दिली व ते विजयी झाले.
विधानसभेच्या निवडणुकीत कळमेश्वरची जागा भगवंतराव गायकवाड यांनी राखली खरी पण ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून. येथूनच पक्षाची घसरण सुरू झाली आणि शेवटपर्यंत ती थांबलीच नाही. आता नावापुरते उमेदवार उभे केले जातात. त्यांना मिळणाऱ्या मतांची संख्या पाहिल्यावर कधीकाळी या पक्षाचे खासदार आणि आमदार शहरात होते यावर विश्वास बसत नाही. २००४ मध्ये उमरेड मतदारसंघातून पक्षाच्या उमेदवाराला १६५१ मते मिळाली होती तर २००९ मध्ये पूर्वमध्ये ६८९ मते तर कामठीतून ३०९ मते मिळाली होती. (प्रतिनिधी)