जपानी होरिबा कंपनीचा बुटीबोरी एमआयडीसीत प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:01 IST2018-07-12T23:59:32+5:302018-07-13T00:01:43+5:30
जपानी होरिबा इंडिया कंपनीचा प्रकल्प बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन १५ जुलैला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.

जपानी होरिबा कंपनीचा बुटीबोरी एमआयडीसीत प्रकल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जपानी होरिबा इंडिया कंपनीचा प्रकल्प बुटीबोरी एमआयडीसीमध्ये उभा राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्घाटन १५ जुलैला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, आ. समीर मेघे असतील. होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू, होरिबा इंडियाचे प्रेसिडेंट डॉ. राजीव गौतम प्रामुख्याने उपस्थित असतील. हा प्रकल्प २०१९ पर्यंत कार्यान्वित होणार आहे. कंपनीचे जगातील अनेक देशांमध्ये उद्योगांचे जाळे असून विविध उत्पादनांमध्ये अग्रेसर आहे.
साधारणत: दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्ह्यातील चाकण येथे छोटी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी गेले असताना समारंभात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जपानी कंपनीचा २०० कोटी रुपये गुंतवणुकीचा मोठा प्रकल्प आता नागपुरात येऊ घातला आहे. उद्घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होरिबा कंपनीने नागपुरात गुंतवणूक केल्यास राज्य शासन संपूर्ण मदत करेल, अशी हमी दिली होती. त्या समारंभात उपस्थित असलेले कंपनीचे संस्थापक आत्सुशी होरिबा, होरिबा इंडियाचे चेअरमन डॉ. जय हाकू यांनी त्यास काहीच दिवसात प्रतिसाद देत नागपुरात प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हाला नागपुरात गुंतवणूकीची प्रेरणा मिळावी, अशी भावना डॉ. हाकू यांनी व्यक्त केली.
नागपूर प्रकल्पात रक्तातील पेशी तपासण्यासाठीचे सेल काऊंटर मशीनचे उत्पादन तसेच त्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे उत्पादन होईल. तसेच जागतिक दर्जाच्या सेंट्रल वेअर हाऊसची उभारणी केली जाईल. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक २०० कोटी रुपयांची असेल. हा प्रकल्प डिसेंबर २०१९ पर्यंत कार्यान्वित होईल. दुसऱ्या टप्प्यात अधिक मोठी गुंतवणूक असेल. या प्रकल्पात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक हजार जणांना रोजगार मिळेल. होरिबा इंडियाच्या भारतातील कुठल्याही प्रकल्पापेक्षा ही सर्वात मोठी गुंतवणूक असेल. जगभर उद्योगांचे जाळे असलेल्या होरिबा लिमिटेडमध्ये सध्या दहा हजार जण कार्यरत आहेत.