विना परवानगी धावत आहे प्रचाररथ
By Admin | Updated: September 30, 2014 00:40 IST2014-09-30T00:40:07+5:302014-09-30T00:40:07+5:30
आॅटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक असताना फक्त दहा वाहनांनी परवानगी घेतली आहे.

विना परवानगी धावत आहे प्रचाररथ
आरटीओ : फक्त दहा वाहनांनी घेतली मंजुरी
नागपूर : आॅटोरिक्षा, कार, बस आणि ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक असताना फक्त दहा वाहनांनी परवानगी घेतली आहे. यामुळे विना परवानगी धावत असलेल्या अशा शेकडो वाहनांवर आरटीओ किंवा निवडणूक आयुक्त कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रचारांची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात १५२ उमेदवारांनी अर्ज केला आहे. यातील बहुसंख्य उमेदवार प्रचारालाही लागले आहेत. त्यांच्या ताफ्यात निवडणूक चिन्हांचे, उमेदवाराचे फलक लावलेली वाहने वस्त्यावस्त्यांमधून व चौकाचौकांतून धावत आहेत. मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
‘प्रचाररथ’ किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगानंतर मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाचे बाह्यरचनेतील बदल, चालकाच्या दृष्टिक्षेपात बाधा तर नाही ना, अशा घटकांची तपासणी करून आरटीओकडून परवानगी दिली जाते. मात्र आतापर्यंत दहा वाहनांनी आरटीओत हजेरी लावून परवानगी घेतली आहे. मात्र शहरात अशी शेकडो वाहने विना परवानगी धावत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)