गरबा कार्यक्रमात प्रचार बंदी

By Admin | Updated: September 25, 2014 01:31 IST2014-09-25T01:31:54+5:302014-09-25T01:31:54+5:30

नवरात्रीनिमित्त विविध मंडळांकडून आयोजित गरबा नृत्य कार्यक्रमात उमेदवारांना एक नागरिक म्हणून उपस्थित राहता येईल; पण या कार्यक्रमाचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही. तसे केल्यास

Prohibition ban in Garba program | गरबा कार्यक्रमात प्रचार बंदी

गरबा कार्यक्रमात प्रचार बंदी

उमेदवाराच्या उपस्थितीला मनाई नाही
नागपूर : नवरात्रीनिमित्त विविध मंडळांकडून आयोजित गरबा नृत्य कार्यक्रमात उमेदवारांना एक नागरिक म्हणून उपस्थित राहता येईल; पण या कार्यक्रमाचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही. तसे केल्यास आयोजकांवरच कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात नवरात्रोत्सव आल्याने आचारसंहितेमुळे त्यावर काही बंधने येणार आहेत. या काळात शहराच्या विविध ठिकाणी मंडळांकडून गरबा नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्याही बहुसंख्य असते. अशा कार्यक्रमांचा राजकीय वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार गरबा नृत्याच्या कार्यक्रमाचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही.
उमेदवारांना त्यात एक नागरिक म्हणून सहभागी होता येईल, पण त्याने तेथे प्रचार करू नये. कार्यक्रमस्थळी राजकीय पक्षांचे फलक किंवा तत्सम प्रचार साहित्य लावण्यासही बंदी आहे.या कार्यक्रमाची परवानगी देतानाच आयोजकांकडून ही बाब लेखी स्वरूपात घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राजकीय प्रचार झाल्याचे आढळून आल्यास आयोजकांवर कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prohibition ban in Garba program