सुरेंद्र गडलिंग यांच्यावरील कारवाईचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 09:26 PM2018-06-07T21:26:53+5:302018-06-07T21:27:30+5:30

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांना अटक करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायालयापुढे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, वकिलांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून गडलिंग यांना तत्काळ सोडण्याची मागणी केली. आंदोलनात वकिलांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

Prohibition of action against Surendra Gadeling | सुरेंद्र गडलिंग यांच्यावरील कारवाईचा निषेध

सुरेंद्र गडलिंग यांच्यावरील कारवाईचा निषेध

Next
ठळक मुद्देवकिलांचे आंदोलन : सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांना अटक करण्यात आल्यामुळे नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दुपारी जिल्हा न्यायालयापुढे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, वकिलांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून गडलिंग यांना तत्काळ सोडण्याची मागणी केली. आंदोलनात वकिलांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
गडलिंग यांना घटनाबाह्यरीत्या अटक करण्यात आली. अटक कारवाई करताना सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही. गडलिंग यांना अटक केल्यानंतर पोलीस त्यांना कुठे घेऊन जाणार आहेत व सध्या त्यांना कुठे ठेवण्यात आले आहे याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली नाही. अशा प्रकारे कारवाई करणे लोकशाहीविरुद्ध आहे. गडलिंग यांनी आपल्या २५ वर्षांच्या कारकिर्दीत केवळ मानवाधिकाराचे रक्षण करण्यासाठी लढा दिला आहे. त्यांचा नक्षलवादी चळवळीशी संबंध जोडणे हा सुनियोजित कटाचा एक भाग आहे असा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकांमध्ये नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, उपाध्यक्ष अ‍ॅड. अक्षय समर्थ, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, अ‍ॅड. निहालसिंग राठोड, अ‍ॅड. विक्रांत नारनवरे, अ‍ॅड. आकाश सोरदे, अ‍ॅड. नीतेश ग्वालबंशी आदींचा समावेश होता.
हायकोर्टात मुंबईचे वकील येणार
अ‍ॅड. सुरेंद्र्र गडलिंग यांच्याविरुद्धची कारवाई रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला आहे. गडलिंग यांच्या पत्नी मीनल यांनी हा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणात गडलिंग यांच्यातर्फे बाजू मांडण्यासाठी मुंबईतील वरिष्ठ अधिवक्ता मिहीर देसाई येणार आहेत. ही माहिती गुरुवारी न्यायालयाला देण्यात आली. त्यानंतर प्रकरणावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष हे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. देसाई यांना अ‍ॅड. निहालसिंग राठोड सहकार्य करतील.
जिल्हा न्यायालयात आज कामबंद
जिल्हा न्यायालयात शुक्रवारी कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेने गुरुवारी आंदोलनानंतर तातडीची बैठक आयोजित करून यासंदर्भात ठराव पारित केला. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी पत्र जाहीर करून वकिलांना जिल्हा न्यायालयात काम न करण्याची व ठरावाला सहकार्य करण्याची विनंती केली.
पुण्यातही केला अन्याय
पोलिसांनी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यावर पुणे येथेही अन्याय केल्याचे जिल्हा विधिज्ञ संघटनेने स्पष्ट केले आहे. याविषयी संघटनेने पुणे येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष यांना पत्र लिहिले आहे. पोलिसांनी अटक कारवाईनंतर गडलिंग यांना ट्रान्झिट रिमांडकरिता नागपुरातील न्यायालयात हजर केले नाही. त्यांना थेट पुणे येथे नेण्यात आले. त्यांना गुरुवारी पुणे येथील जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावतीने अ‍ॅड. मालविया यांनी बाजू मांडली. या वकिलाला गडलिंग यांनी नियुक्त केले नव्हते. अ‍ॅड. सुसन अब्राहम या त्यांच्यातर्फे बाजू मांडण्यासाठी न्यायालयात गेल्या होत्या. परंतु, त्यांना गडलिंग यांच्यासोबत भेटू देण्यात आले नाही. अ‍ॅड. सुसन अब्राहम, अ‍ॅड. निहालसिंग राठोड, अ‍ॅड. जगदीश मेश्राम, अ‍ॅड. विक्रांत नारनवरे व अ‍ॅड. अरुण फेरेरा हे वकील गडलिंग यांचे प्रतिनिधित्व करतात. याची दखल घेण्यात यावी, असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.

Web Title: Prohibition of action against Surendra Gadeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.