कपाशीचे प्रतिबंधित बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:54+5:302021-06-09T04:10:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : कृषी विभागाच्या भरारी व नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कळमेश्वर पाेलीस ...

कपाशीचे प्रतिबंधित बियाणे जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कृषी विभागाच्या भरारी व नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर-माेहपा-सावनेर मार्गावर कारवाई करीत या प्रतिबंधित बियाण्यांच्या पॅकेटची वाहतूक करणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून बियाण्यांचे पॅकेट व कार असा एकूण ११ लाख १५ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शेषराव नागेश नारनवरे रा. वडविहिरा, ता. काटोल असे अटक करण्यात आलेल्या आराेपी कारचालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कृषी विभागाचे भरारी पथक कळमेश्वर परिसरात गस्तीवर हाेते. त्यातच त्यांना सावनेरहून कळमेश्वरच्या दिशेने कपाशीच्या एचटीबीटी बियाण्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या मार्गावरून जाणाऱ्या हलक्या वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
त्यांनी एमच-४०/बीजे-८७८६ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. त्या कारमध्ये त्यांना प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांचे पॅकेट आढळून येताच त्यांची कारचालक शेषराव नारनवरे यांस अटक करीत त्याच्याकडून कार व बियाण्याचे पॅकेट ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये १ लाख १५ हजार ५० रुपये किमतीचे प्रतिबंधित बियाण्यांचे १५० पॅकेट आणि १० लाख रुपयांची कार असा एकूण ११ लाख १५ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी कृषी अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून भादंवि ४२०, ४१७, ४६८, बियाणे नियंत्रण कायदा ७ (ए, बी, सी), १४, पर्यावरण संरक्षण कायदा सहकलम १५ (१) (२), १६ (१) (२) अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, सहायक फाैजदार जयप्रकाश शर्मा, दिनेश अधापुरे, राजू रेवतकर, वीरेंद्र नरड, विपीन गायधने, महेश बिसने, भाऊराव खंडाते, कृषी विभागाचे उमाकांत हतागळे, दीपक जंगले, राकेश वासू व युवराज सेवतकर यांच्या पथकाने केली.
...
निंदणाचा खर्च कमी
केंद्र शासनाने कपाशीच्या एचटीबीटी वाणावर प्रतिबंध घातला असला तरी निंदणाचा खर्च कमी हाेत असल्याने शेतकरी या वाणाला प्राधान्य देत आहे. पावसाळ्यात निंदणाला मजूर मिळत नसल्याने तसेच वाढीव मजुरी द्यावी लागत असल्याने कापसाचा उत्पादन खर्च वाढताे. वेळीच निंदण न केल्यास उत्पादन कमी हाेण्याची शक्यता असते. कपाशीच्या एचटीबीटी वाणावर तणनाशकाची फवारणी केल्यास निंदणाचा खर्च कमी हाेत असल्याने आपण हे वाण वापरत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी खासगीत दिली. तणनाशकाचा प्रतिकार करणारी काही पिकांच्या बियाण्यांवर शासनाने बंदी घातली नाही. मग कपाशीच्या बियाण्यांवर बंदी का घातली, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.