जिगांव सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराचा तपास प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 20:06 IST2017-12-12T20:05:24+5:302017-12-12T20:06:50+5:30
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या जिगांव सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास प्रगतिपथावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी उपस्थित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

जिगांव सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराचा तपास प्रगतिपथावर
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या जिगांव सिंचन प्रकल्पात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास प्रगतिपथावर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी उपस्थित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले की, जिगाव प्रकल्प उपसा सिंचन योजना क्र. २ मध्ये मे. बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनी, यवतमाळ निविदेसाठी पात्र नसताना पात्र ठरावे व त्याचा आर्थिक फायदा व्हावा या गैरउद्देशाने कट व अन्यायाने संगनमत करून कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपूर यांनी कंपनीने निकषाप्रमाणे न केलेल्या कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. कंपनीने ते बनावट प्रमाणपत्र खरे म्हणून वापर केला व पात्रता अटी तपासणी कार्यवाहीमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून खोटा पुरावा सादर करून शासनाची फसवणूक केली, असे अॅण्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांच्याकडून करण्यात आलेल्या उघड चौकशीदरम्यान निष्पन्न झाल्याने कंपनीचे संचालक व सात अभियंता यांच्याविरुद्ध खामगाव पोलीस स्टेशन येथे गेल्या ३ नोव्हेंबर रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.