प्राध्यापकांनी राजकारणापेक्षा संशोधनाकडे लक्ष द्यावे
By Admin | Updated: July 12, 2015 03:13 IST2015-07-12T03:13:47+5:302015-07-12T03:13:47+5:30
विदर्भात अनेक नवनवीन उद्योग येत असताना त्यांना पूरक असे अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उपलब्ध नाहीत ही खंत आहे.

प्राध्यापकांनी राजकारणापेक्षा संशोधनाकडे लक्ष द्यावे
नितीन गडकरी : शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील गुणवंतांचा सत्कार
नागपूर : विदर्भात अनेक नवनवीन उद्योग येत असताना त्यांना पूरक असे अभ्यासक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उपलब्ध नाहीत ही खंत आहे. परंतु संशोधनातदेखील विद्यापीठ मागेच आहे. प्राध्यापक मंडळी आता निवडणुकांच्या तयारीत व्यस्त झाली आहेत. त्यांनी यापेक्षा संशोधनाकडे जास्त लक्ष दिले पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातर्फे संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड.अरुणकुमार शेळके, आमदार अनिल सोले, संस्थेचे उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, वसंतराव चर्जन, डॉ.सुरेश ठाकरे, ‘नीरी’चे संचालक डॉ.सतीश वटे, प्राचार्य डॉ.देवेंद्र बुरघाटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांच्या हस्ते बारावी, विविध प्रवेशपरीक्षा तसेच क्रीडाक्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यापीठ प्रशासनाचा उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी समन्वयच नसल्याचे दिसून येते. विद्यापीठाच्या अभ्यासमंडळात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तेथे प्राध्यापकच जास्त प्रमाणात असतात. यातूनच ‘व्हिजन’चा अभाव दिसून येतो असे नितीन गडकरी म्हणाले. एखाद्या परीक्षेतील यश हे अंतिम ध्येय असू नये. नोकरीपेक्षा विद्यार्थ्यांनी उद्योगाला प्राधान्य देण्याचा काळ आला आहे असा सल्लादेखील गडकरी यांनी यावेळी दिला. अॅड.अरुण शेळके यांनीदेखील यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी व महाविद्यालयांच्या बौद्धिक संपदेचे मोजमाप व्हायला हवे असे ते म्हणाले.
डॉ.बुरघाटे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीवर भाष्य केले. यावेळी संस्थेचे विविध पदाधिकारी, आजी-माजी प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कांचन दाते यांनी संचालन केले तर दीपक कडू यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)