‘चित्रांश’ने घातला व्यावसायिकांना गंडा
By Admin | Updated: March 27, 2015 01:59 IST2015-03-27T01:59:04+5:302015-03-27T01:59:04+5:30
चित्रांश नामक कंपनीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवत भिवापुरातील ५० व्यावसायिकांनी त्यात प्रत्येकी ३५ हजार रुपये गुंतविले होते.

‘चित्रांश’ने घातला व्यावसायिकांना गंडा
भिवापूर : चित्रांश नामक कंपनीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवत भिवापुरातील ५० व्यावसायिकांनी त्यात प्रत्येकी ३५ हजार रुपये गुंतविले होते. मात्र, सदर कंपनी बोगस असल्याचे स्पष्ट होताच या सर्व व्यावसायिकांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, चित्रांशने भिवापुरातील या व्यावसायिकांना एकूण २० लाख रुपयांनी गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
चित्रांश टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीने एक योजना वर्षभरापूर्वी सुरू केली होती. या योजनेंतर्गत ३५ हजार रुपयांची प्राथमिक गुंतवणूक केल्यानंतर प्रति महिना सात हजार रुपये देण्याची बतावणी करण्यात आली होती. यासाठी कंपनीने भिवापुरातील काही दुकानांमध्ये एलसीडी लावून जाहिरात केली होती. ही कंपनी गुंतवणूक करणाऱ्यांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत सात हजार रुपये सहा ते १२ महिन्यांपर्यंत आठ हजर रुपये १२ ते ३६ महिन्यांपर्यंत १० हजार रुपये देणर होती.
या आमिषाला बळी पडून भिवापुरातील काही व्यावसायिकांनी प्रत्येकी ३५ हजार रुपयांप्रमाणे गुंतवणूक केली होती. सुरुवातीला काहींनी या कंपनीकडून धनादेशही प्राप्त झाले.
त्यामुळे इतरांचा विश्वास बसल्याने गुंतवणुकदारांची संख्या वाढूून ती ५० वर पोहोचली. या सर्वांनी ३५ हजार रुपयांचा भरणा करून त्यांच्या दुकानांमध्ये एलसीडी लावला. काही महिन्यानंतर या व्यवासायिकांना धनादेश मिळणे बंद झाले. काहींचे धनादेश वटले नाही. त्यामुळे त्यांनी पैशासाठी एजंटकडे तगादा लावायला सुरुवात केली.
या कंपनीचे बिंंग फुटल्याने फसवणूक झाल्याचे त्या व्यवासायिकांच्या लक्षात आले. या प्रकरणी कुणीही भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची नावे कळू शकली नाहीत. (तालुका प्रतिनिधी)
धनादेश ‘बाऊ न्स’
या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांपैकी अनेकांचे धनादेश बाऊन्स झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली. काहींनी कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयात धाव घेतली. काहींनी नागपूर शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्याने या कंपनीच्या संचालकांसह पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पोलीस ठाण्यात कुणीही तक्रार नोंदविली नाही. काहींनी त्यांच्या दुकानातील टीव्ही संच काढून टाकत ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली.
एजंट भूमिगत
सदर प्रकार चव्हाट्यावर येताच अनेकांनी या कंपनीच्या एजंटशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, या एजंटने कुणालाही प्रतिसाद दिला नाही. उलट, सर्व एजंट भूमिगत झाले. या कंपनीचे संचालक कोण आहे, कार्यालय कुठे आहे, त्यात नेमकी किती व्यावसायिकांनी किती रक्कम गुंतविली, हे कळायला मार्ग नाही. यात काहींनी कर्ज काढून तर काहींनी उसनवार करून गुंतवणूक केल्याची माहिती जाणकारांनी दिली. कुणीही भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली नाही.