कमाल चौकातील व्यापाऱ्यांची घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST2021-04-07T04:07:40+5:302021-04-07T04:07:40+5:30
नागपूर : कमाल चौकातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११.४५ वाजताच्या दरम्यान घोषणाबाजी आणि निदर्शने केली. लाॅकडाऊन अन्यायकारक असून सर्वसामान्य जनता ...

कमाल चौकातील व्यापाऱ्यांची घोषणाबाजी
नागपूर : कमाल चौकातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सकाळी ११.४५ वाजताच्या दरम्यान घोषणाबाजी आणि निदर्शने केली. लाॅकडाऊन अन्यायकारक असून सर्वसामान्य जनता आणि व्यापाऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे लॉकडाऊन परत घ्यावे, अन्यथा आम्ही स्वत:हून नियम मोडून दुकाने उघडू, असा इशारा कमाल चौक व्यापारी दुकानदार संघाने दिला.
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी व्यापारी आणि दुकानदारांचा संताप पाहावयास मिळाला. सकाळपासून या परिसरातील बाजारेपठा बंद होत्या. दुकाने उघडण्यासाठी आलेल्या दुकानदारांनी या परिसरातच एकत्र येऊन घोषणाबाजी केली. प्रशासनाने आणि शासनाने दुकानदारांचा अंत पाहू नये. मागील वर्षभराच्या लाॅकडाऊनमध्ये प्रचंड नुकसान झाले. आता परिस्थिती सावरायला लागली असताना लॉकडाऊन लावल्याने व्यापाऱ्यांनी कसे जगायचे, व्यापार कसा करायचा, असा प्रश्न पवन देवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला. सरकारला लॉकडाऊन लावायचेच असेल तर आधी देशातील राजकीय सभा, संमेलने थांबवा, असे ते म्हणाले.
आम्ही शांततापूर्ण मार्गाने दुकाने उघडू. प्रशासनाने व्यापारी-दुकानदारांची अडचण समजून घ्यावी. आपल्या अडचणींबद्दल प्रशासनाकडे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खुशाल वासवानी, अविनाश मोखानी, महम्मद वसीम, संजय जैन, जय प्रेमानी, मोहन खनुजा, प्रेम टहलरामानी यांच्यासह अनेक व्यापारी उपस्थित होते.
...
व्यापारी रस्त्यावर
इंदोरा चौक ते कमाल चौक परिसरात ३०० ते ४०० लहान-मोठे व्यापारी आहेत. मंगळवारी सकाळी हे बहुतेक व्यापारी एकत्र आले होते. लॉकडाऊनचा युवा व्यापारीवर्गाने विरोध व्यक्त केला. अनेक व्यापारी गटागटाने यावर चर्चा करून विरोध दर्शविताना दिसले.
...