बांधकामातील मंदीमुळे व्हॅट संग्रहणात अडचण
By Admin | Updated: March 17, 2017 03:04 IST2017-03-17T03:04:01+5:302017-03-17T03:04:01+5:30
चालू आर्थिक वर्षांत नागपूर विक्रीकर विभागाचे ४५५४ कोटी रुपये व्हॅट संग्रहणाचे लक्ष्य आहे.

बांधकामातील मंदीमुळे व्हॅट संग्रहणात अडचण
विक्रीकर विभागाचे सहआयुक्त पूनमचंद अग्रवाल यांची माहिती
मोरेश्वर मानापुरे नागपूर
चालू आर्थिक वर्षांत नागपूर विक्रीकर विभागाचे ४५५४ कोटी रुपये व्हॅट संग्रहणाचे लक्ष्य आहे. परंतु बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत सिमेंट आणि स्टील कंपन्यांनी व्हॅट कमी भरला. त्यामुळे २०१६-१७ या आर्थिक वर्षांत लक्ष्य पूर्ण करण्यात विभागाला अडचणी येत असल्या तरीही लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती नागपूर विक्रीकर विभागाचे सहआयुक्त पूनमचंद अग्रवाल यांनी दिली.
लोकमतशी चर्चा करताना अग्रवाल म्हणाले, दरवर्षी प्रत्येक कंपनीकडून १३ टक्के वाढ अपेक्षित असते.
यंदा आर्थिक वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत ३८७२.९७ कोटी रुपये व्हॅट गोळा झाला आहे. मार्चमध्ये जवळपास ४२५ कोटी कर संग्रहणाची अपेक्षा आहे, यावर्षी उद्दिष्टांपेक्षा जवळपास ३२५ कोटी रुपये कमी व्हॅट गोळा होण्याची शक्यता आहे. २०१६-१७ आर्थिक वर्षांत ३९५० कोटींची व्हॅट वसुली तर त्यामागील वर्षात ३५०० कोटींचे उद्दिष्ट असताना ३६५० कोटींचा व्हॅट गोळा झाला होता.