पायलट कार मिळविताना लोकसभाध्यक्षांना अडचण

By Admin | Updated: March 6, 2015 02:28 IST2015-03-06T02:28:04+5:302015-03-06T02:28:04+5:30

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना प्रोटोकॉलनुसार ‘झेड’ वर्गवारीतील सुरक्षा मिळत असली तरी नागपूर दौऱ्यात त्यांना साधी पायलट कार उपलब्ध करून देण्यास पोलिसांनी दिरंगाई केली.

Problems with the Speaker Getting Pilot Car | पायलट कार मिळविताना लोकसभाध्यक्षांना अडचण

पायलट कार मिळविताना लोकसभाध्यक्षांना अडचण

विहंग सालगट नागपूर
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना प्रोटोकॉलनुसार ‘झेड’ वर्गवारीतील सुरक्षा मिळत असली तरी नागपूर दौऱ्यात त्यांना साधी पायलट कार उपलब्ध करून देण्यास पोलिसांनी दिरंगाई केली. नागपूर पोलिसांची उदासीन भूमिका पाहता लोकसभाध्यक्षांच्या खासगी स्टाफने मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने कारची व्यवस्था केली होती. शेवटी दिल्ली कार्यालयाकडून मिळालेल्या फॅक्सच्या आधारावर जिल्हा प्रशासानाने पुढाकार घेतल्याने त्यांना पायलट कार उपलब्ध करून
देण्यात आली.
लोकसभाध्यक्षांचे पद महत्त्वपूर्ण व गौरवास्पद मानले जाते. या पदाचा एक प्रोटोकॉल आहे. गुरुवारी महाजन यांना नागपूरमार्गे बैतूल येथे जायचे होते. त्यांच्या व्यवस्थेसाठी त्यांचा खासगी स्टाफ एक दिवसापूर्वीच नागपुरात दाखल झाला होता.
जिल्हा प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली होती. बुधवारी दुपारीच त्यांच्या प्रवासाशी संंबंधित व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली. महाजन या रस्ता मार्गाने बैतूलला जाणार होत्या. महामार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असल्यामुळे एक पायलट कार असणे आवश्यक आहे, असे त्यांच्या खासगी स्टाफचे मत होते. दिल्लीहून आलेल्या स्टाफने पायलट कारच्या संदर्भात नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी वाहन उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शविली.
त्यांनी स्टाफला मुंबईहून परवानगी घेण्याचा सल्ला दिला. यानंतर या प्रकरणाची माहिती दिल्ली येथील कार्यालयाला देण्यात आली. तेथून फॅक्सच्या माध्यमातून पत्र मागविण्यात आले.हे पत्र जिल्हा प्रशासनाला सोपविण्यात आले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा पायलट कार उपलब्ध करून दिली.

‘पायलट’ची मागणी पूर्ण केली
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन शहरात असल्यामुळे त्यांच्या ताफ्यासाठी पायलट कारची मागणी करण्यात आली होती. याबाबत आपण स्वत: प्रोटोकॉल अधिकाऱ्याला संबंधित व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. संबंधित विभागातर्फे पायलट वाहनांची व्यवस्था करण्यात आली.
- अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी

Web Title: Problems with the Speaker Getting Pilot Car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.