तुटलेले चेंबर, तुंबलेल्या गडर लाइन बनणार समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:17+5:302021-05-30T04:07:17+5:30

पावसाळा जवळ आला; पण दुरुस्तीचा पत्ता नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड संक्रमणाच्या नावाखाली झोन अधिकाऱ्यांची मनमानी सुरू ...

Problems with broken chambers, overgrown fence lines | तुटलेले चेंबर, तुंबलेल्या गडर लाइन बनणार समस्या

तुटलेले चेंबर, तुंबलेल्या गडर लाइन बनणार समस्या

पावसाळा जवळ आला; पण दुरुस्तीचा पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमणाच्या नावाखाली झोन अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. तुटलेले चेंबर, तुंबलेल्या गडर लाइन दुरुस्तीची कामेही झोन स्तरावर केली जात नाही. मान्सूनपूर्व तयारीच्या नावाखाली फक्त नदी-नाले सफाईच्या कामात मनपाची यंत्रणा लागली आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस आल्यास शहरातील नागरिकांवर संकट येण्याची शक्यता आहे.

मागील दोन वर्षांपासून प्रभाग स्तरावर लहान-सहान कामासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी तक्रारीची दखल घेत नाही. दुसरीकडे कोविड संक्रमणामुळे मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे नगरसेवक नागरिकांना सांगतात. झोन स्तरावर तक्रार केली, तर संबंधित कामासाठी आर्थिक तरतूद नसल्याचे सांगितले जाते. त्रस्त नागरिक स्वत:च्या स्तरावर समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरेंद्र गड परिसरातील नागरिक वर्गणी गोळा करून चेंबरवरील झाकण बदलत आहेत. त्यानंतरही मनपा प्रशासनाला जाग आलेली नाही. नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर घेणारे कर्मचारी व अधिकारी स्वत:च्या स्तरावर खर्च करीत आहेत; परंतु नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पैसा नाही.

........

मनमानी दरावर निविदा, त्यानंतरही काम नाही

गडर लाइनचे नादुरुस्त पाइप बदलणे, नवीन टाकणे, चेंबर दुरुस्ती आदी कामांची मनपाने निविदा काढली होती. यात फक्त चार झोनसाठी गुजरातच्या एका कंपनीने निविदा भरली. १३ कोटींचे काम १८ कोटींत करण्याची तयारी दर्शविली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून मनपा अधिकाऱ्यांना थापा देत आहे. कधी कोरोनाचे कारण, तर कधी मजूर मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. मान्सूनच्या आगमनासाठी १५ दिवस शिल्लक आहेत. याचा विचार करता पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता नाही.

...

चार वेळा बैठक घेतली

चार झोनमधील गडर लाइन बदलणे, नवीन टाकण्याच्या कामाची निविदा काढली. गुजरातच्या कंपनीने निविदा भरली. त्यांच्यासोबत चार वेळा बैठका झाल्या; परंतु काम सुरू झाले नाही, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली. प्रशासनाला तुटलेले चेंबर दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाचीच ही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Problems with broken chambers, overgrown fence lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.